मधुकर चव्हाण समर्थकांची भावनिक अन् संतापजनक पोस्ट; उमेदवारी न मिळाल्याने चव्हाण समर्थक अजूनही नाराज
आरंभ मराठी / धाराशिव
1957 सालापासून काँग्रेसचा झेंडा हातात घेतलेले, धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण साहेब ज्यांनी विधानसभेच्या 8 निवडणुका लढवल्या आणि 5 निवडणुकांमध्ये विजय संपादन केला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरदचंद्र पवार, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यासोबत काँग्रेस पक्षाचे सक्रिय राजकारण केले. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मराठवाड्याच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये सतत संघर्ष केला.
मराठवाड्याच्या न्याय हक्काचे 23.26 टीएमसी पाणी स्वतःच्या ताकतीवर आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्वाक्षरीने हे उजनीचे पाणी मराठवाड्यासाठी विशेषतः धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केले. या बैठकीच्या एक दिवस अगोदर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख सहभागी होते, तिथे मधुकरराव चव्हाण यांनी “हे 23.26 टीएमसी पाणी मंजूर करा किंवा माझा राजीनामा घ्या” अशी निर्वाणीची भूमिका घेतली तेव्हा मधुकरराव चव्हाण यांची या प्रश्नासोबतची तळमळ पाहून वित्तमंत्री आणि जलसंपदामंत्र्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. अशी दमदार आणि कणखर भूमिका घेऊन ज्या मधुकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाचे काम केले अशा ज्येष्ठ आणि कामांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या लोकनेत्याचा अवमान २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाला.
पक्षाने न्याय केला नाही
सदैव आपल्या कामाच्या जोरावर पक्षाच्या धोरणानुसार आणि जनतेच्या कल्याणासाठी विशेषतः तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी ज्या माणसाने ६० वर्ष प्रदीर्घकाळ राजकारण केले. त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने हात आखडता घेतला आणि ती उमेदवारी इतरांस दिली. उमेदवारी इतरांना देण्याबाबत मधुकरराव चव्हाण यांचे दुमत नक्की नाही त्यांनी ते आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले. आपल्याला दुःख आहे ते ज्या काँग्रेस पक्षासाठी आपण आयुष्यभर काम केले त्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेश आणि निवडणुकीची संबंधित असणाऱ्या नेत्यांनी आपल्याबरोबर या वयामध्ये न्याय केला नाही. ज्या वयामध्ये लोक जगण्यासाठी धडपड करतात त्या ९० च्या वयामध्ये मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे काम करतात गावोगाव फिरतात आजही घरामध्ये न बसता दररोज सकाळी आणि सायंकाळी ग्रामीण भागामध्ये फिरतात जुन्या आणि नव्या लोकांशी बातचीत करतात आपण निवडणूक लढवणार आहोत हे तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात.
या वयामध्ये मधुकरराव चव्हाण साहेब निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले ते केवळ आमच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याच्या बळावर आणि आग्रहाखातर. सात आठ महिन्यापूर्वी मधुकरराव चव्हाण साहेब पुढच्या निवडणुकीला आपण लढणार नाही अशी भूमिका घेऊन बसलेले होते तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधुकरराव चव्हाण साहेब यांना आग्रह केला आणि सांगितले की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करण्यासाठी तुम्हीच उमेदवार असले पाहिजे कारण या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करण्यासाठी तुमच्या शिवाय दुसरा कोणताही उमेदवार योग्य नाही. त्यानंतर साहेबांनी एक महिन्यानंतर बसल्यानंतर तुमचा एवढा आग्रह आहे तर मला माझ्या प्रकृतीने साथ दिली तर मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. तेव्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खूप मोठे बळ मिळाले आणि त्या दिवसापासून आम्ही रात्रंदिवस काम करत राहिलो दरम्यान लोकसभेच्या निवडणुका देखील आल्या आणि त्यामध्ये देखील आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचाच प्रचार केला. ना मला साहेबांनी काही वेगळे सांगितले किंवा इतर नेत्यांनी काही वेगळे सांगितले आम्ही महाविकास आघाडीचा आघाडी धर्म अत्यंत प्रामाणिकपणे पाळला. खासदार होणारे राजेनिंबाळकर यांच्या विजयामध्ये आमचा देखील सिंहाचा नाही तर खारीचा वाटा नक्की आहे कारण आम्ही निष्ठावंत, प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ते आहोत.
चव्हाण यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
या दरम्यान काँग्रेसच्या काहींनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पासूनच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची बदनामी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दररोजचे कामकाज चालू ठेवले होते. त्याच्यामध्ये सुनील मधुकरराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या प्रयत्नांना आयतेच कोलीत मिळाले. याचे त्यांनी भांडवल केले आणि त्याच्या लेखी तक्रारी प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेसकडे केल्या. साहेबांना बदनाम केल्याशिवाय आपल्याला तिकीट मिळणार नाही अशी खूनगाठ या लोकांनी मनामध्ये बांधली होती. त्यानुसार त्यांनी एका मागून एक पडद्यामागे षडयंत्र रचण्यासाठी आणि मांडण्यासाठी आपले कष्ट घातले.
जेव्हा उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीकडे भेटण्यासाठी गेलो तेव्हा देखील त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्याचे कारण म्हणजे मधुकरराव चव्हाण साहेब यांचे ग्राउंड लेव्हलला असलेले भरीव काम सर्व दूर पसरलेले आहे त्यांना माहित आहे की मधुकरराव चव्हाण साहेब हे देखील खूप मोठे नेते आहेत. मधुकरराव चव्हाण यांच्या सहभागाशिवाय काँग्रेस पक्षाला विजय मिळवताच येत नाही. तरी आम्ही साहेबांच्या कामावर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून साहेबांना उमेदवारी मिळेल याच विश्वासात होते. परंतु अखेरीस बदनामी करून उमेदवारी डावलण्यात आली ही बाब अत्यंत खेदजनक आणि मनाला न पटणारी होती. मधुकरराव चव्हाण साहेब नसताना काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरण्यासाठी आम्हाला जाता आले नाही आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे घडले की आम्ही काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हतो. तरी आमच्या आग्रहाखातर साहेब अपक्ष उमेदवारी साठी तयार झाले आणि उमेदवारी भरली. त्यानंतर साहेबांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विचार केला आणि उमेदवारी न लढवण्याचा निर्धार करून उमेदवारी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज देखील मागे घेतला
डोळ्यातलं पाणी
साहेबांनी अर्ज मागे घेतल्याची बातमी समजताच आम्ही जवळपास 200 कार्यकर्ते मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या संपर्क कार्यालयात आलो तिथे पाय ठेवायला जागा नव्हती एवढे कार्यकर्ते जमले होते आणि साहेबांनी आम्हाला धीर दिला. साहेब जवळपास १५ मिनिट बोलले. परंतु साहेब उभे राहिल्यापासून साहेब कार्यालयाच्या बाहेर जाईपर्यंत आमच्या डोळ्यातले पाणी हटले नाही. सर्व कार्यकर्ते आयुष्यामध्ये कधीही एवढे रडले नसतील. एवढा शोक त्यांना झाला नसेल तो शोक आणि त्या डोळ्यातील अश्रू या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये बाहेर पडले. सर्व काही नकळत घडलं साहेबांनी जी भावना बोलून दाखवली त्याच्यामुळे वाटले की मधुकरराव चव्हाण साहेब हे व्यक्ती आहेत की देव आहेत. कारण सामान्य माणूस एवढा विशाल आणि मोठा विचार करू शकत नाही काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मधुकरराव चव्हाण साहेब यांनी या १५ मिनिटांमध्ये जे विचार मांडले, जो कार्यकर्त्यांना धीर दिला, ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका सांगितली ही ऐकल्यानंतर मधुकरराव चव्हाण साहेब एवढ्या ७० वर्ष कशासाठी राजकारण करत होते आणि का करत होते, कसे करत होते याचा सविस्तर वस्तू पाठ मिळाला.
या दरम्यान हिमालया एवढे उंच असणारे मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहिले आणि साहेबांच्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर पडू लागले तेव्हा तर आम्ही सर्व कार्यकर्ते अक्षरशः उभे राहू शकलो नाहीत. आम्हाला आमच्या पायाखालची जमीन काही क्षणासाठी नव्हती असा आभास झाला. साहेबांशी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या काळात आपल्या सोबत वर्तन केले आहे हे आपल्या कारकिर्दीला आणि काँग्रेस पक्षाला शोभणारे नाही. अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. ज्या पक्षासाठी आपण उभे आयुष्य काम केले, ज्या पक्षाला वाढावे म्हणून तसेच अडचणीच्या काळात देखील पक्षाला कधी बगल दिली नाही. त्या पक्षाने आपला विचार केला नाही आपल्याशी मनमोकळेपणे संवाद साधला नाही याचे साहेबांना मनापासून दुःख झाले ते म्हणाले की इतरांना उमेदवारी देण्याचे मला वाईट वाटले नाही परंतु पक्षाने ज्या पद्धतीने व्यवहार केला माझ्या ज्येष्ठतेचा आणि माझ्या आयुष्यभर काँग्रेस पक्षाची सेवा केल्याचा पक्षाने अपमान केला आहे असे साहेबांना आम्हाला सांगायचे होते आम्ही ते सहज समजून घेतले. त्यानंतर उपस्थित राहिलेले सुमारे 200 कार्यकर्ते एकही शब्द कोणाला एक बोलले नाही, बोलू शकले नाहीत कारण साहेबांनी त्या पंधरा मिनिटांमध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना जो धीर दिला होता त्याच्यामध्ये जे त्यांनी शब्द उपयोगात आणले होते हे ऐकल्यानंतर साहेब व्यक्ती नसून साहेब देव आहेत त्यांच्यामध्ये देवत्व आहे याची प्रचिती आली. आणि दुसऱ्या बाजूला संताप देखील झाला कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये काँग्रेस पक्षाला वेळ मिळाला नाही किंवा त्यांनी साहेबांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अवमानच केला आहे त्यामुळे एकदा झालेला आव्हान कसा भरून निघेल कोणत्या शब्दांमध्ये याची चर्चा बाहेर करावी अशा मनस्थितीमध्ये सर्वजण आज वावरत आहोत आम्ही स्वतःला विसरून गेलो आहोत आम्ही केवळ साहेबांच्या या मोठ्या कारकीर्दीत मधील अत्यंत छोटे घटक आहोत, याची जाणीव देखील आम्हाला आहे. आमच्यासारख्या अनेक पिढ्या साहेबांनी आपल्या सोबत पुढे नेलेल्या आहेत.
योगदान विसरता येणार नाही
या दुष्काळी तालुक्याला बागायती तालुका करण्याचे भाग्य मधुकरराव चव्हाण यांच्या हाताने यशस्वी झालेले आहे. ज्या भागामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हते त्या भागामधून आज द्राक्षाचे कंटेनर परदेशात निर्यात होत आहे. ज्या भागात एकही ऊस उत्पादक शेतकरी नव्हता तिथे वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने साहेबांनी नरेंद्र बोरगावकर, सि. ना. आलूरे गुरुजी आणि शिवाजीराव बाभळगावकर यांच्या सोबत काम करून श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थापन केला.
तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 325 कोटी रुपयांचा निधी दिला हा निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा म्हणून महाराष्ट्रातले पहिले तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजापूरच्या विकासाला निधी दिला. ८० साठवण तलाव उभे करून सर्व तालुका पाणीदार केला. नळदुर्गचे दोन मोठे बॅरेजेस बांधल्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलीताखाली आले, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे देवस्थान पन्नास वर्षे साहेबांनी आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सर्व पुजारी बांधवांना सोबत घेऊन त्यांचे हक्क आणि सर्व सेवा कायम ठेवण्या मध्ये मोलाची भूमिका बजावली. आज तुळजापूरच्या यात्रा व्यवसाय टिकवण्यामध्ये मधुकरराव चव्हाण आणि माणिकराव खपले या दोघांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
थेंबाचा हिशोब होणार
मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहिले आणि ते डोळ्यांमधील अश्रू आम्ही पाहिले आहेत, या प्रत्येक थेंबाचा हिशोब या निवडणुकीमध्ये होणार आहे, करावा लागणार आहे. कारण ज्या काँग्रेस पक्षासाठी ज्या आमच्यासारख्या सामान्य आणि यापूर्वी दिवंगत झालेल्या कार्यकर्त्यासाठी साहेबांनी अपार कष्ट घेतले अशा साहेबांना आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आणण्यासाठी भाग पाडणाऱ्या सर्व घटकांना त्यांच्या चुकीच्या कामाचा हिशोब द्यावा लागेल.अशी माझी मनोभूमिका आहे. कारण साहेबांनी कधीही एकाही कार्यकर्त्याला अपमानित केले नाही सदैव त्यांनी गरिबातल्या गरीब कार्यकर्त्याला न्याय दिला वेळप्रसंगी प्रतिष्ठा दिली आणि पद देखील दिले. मधुकरराव चव्हाण साहेब ही कोणी सामान्य व्यक्ती नक्की नाही जरी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे जेष्ठत्व आणि त्यांचे श्रेष्ठत्व समजलेले नसले त्यांनी जाणून-बुजून ही भूमिका घेतलेली असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन साहेबांना दूषित करून इतरांना उमेदवारी देण्याचा असल्यामुळे हा प्रकार झालेला आहे परंतु हा प्रकार ज्या घटकांनी करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे अशा लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय साहेबांच्या डोळ्यातून बाहेर पडलेल्या अश्रूंना न्याय मिळणार नाही. अशी माझी एक काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भावना आहे, भूमिका आहे.
आपल्या शरीरातील रक्ताचा थेंब आमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी उपयोगात आणणारे आमचे साहेब यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्यानंतर ज्या भावना आमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या भावना माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत याची जाणीव मला आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही मधुकरराव चव्हाण साहेब यांच्यापासून दूर जाणार नाही किंवा वेगळा विचार करणार नाही. या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आपणा साठी उभी आहे त्याचा उपयोग आपण करणार आहोत की नाही याचा निर्धार करण्याची ही वेळ आहे. साहेबांच्या डोळ्यांमध्ये ज्यांनी अश्रू उभे केले त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले पाहिजेत ही जबाबदारी माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याची आहे.
शब्दांकन:
दादासाहेब चौधरी
रा. जवळगा मे.