आरंभ मराठी / धाराशिव
उस्मानाबाद लोकसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 30.54 टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी काही ठिकाणी रांगा लागल्या आहेत. उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली असून, प्रचंड उन्हातही मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. दरम्यान, यावेळी मतदानाचा हक्क वाढण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद लोकसभेसाठी यावेळीही चुरशीचा सामना पहायला मिळाला. राजेनिंबाळकर आणि डॉ.पाटील यांच्या घरातच म्हणजे नेहमीप्रमाणे ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने झाली. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी कुटुंबासह जाऊन मतदान केले. सध्या आजारी असलेले माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी तेर येथे आपल्या मूळ गावी जाऊन मतदान केले.त्यांच्यासमवेत आमदार राणा जगजितसिंह पाटील, महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील, मल्हार आणि मेघ पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आमदार कैलास पाटील यांनी सारोळा येथील मतदान केंद्रावर आपले मतदान केले. उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले,माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी कुटुंबासह जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.दुपारनंतर म्हणजे उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर मतदान वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक विभागाने केली जनजागृती
मतदानाचा टक्का वाढण्यासाठी यावेळीही निवडणूक विभागाने मतदारसंघात जनजागृती मोहीम जोरदारपणे राबवली. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.सकाळपासून उस्मानाबाद लोकसभेसाठी उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी सोमवारी दिवसभर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला.
2014 च्या तुलनेत 2019 मध्ये कमी झाले होते मतदान
2019 च्या निवडणुकीत 57 टक्के मतदान झाले होते. तर 2014 च्या निवडणूकीत 65 टक्के मतदान झाले होते. म्हणजे गेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला होता. यावेळी निवडणूक आयोगाने मतदार जनजागृती मोहीम जोरदारपणे राबवली असून, मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे.