आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मधील तब्बल २ कोटी १३ लाख १९ हजार ७०३ रुपयांच्या प्रचंड चोरीचा गुन्हा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख रुपये रोख रक्कम व २ किलो १५९ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेतले.
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या चोरीत सोसायटीतील ग्राहकांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली होती. या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे तुळजापूर येथे गु. र. नं. २९३/२०२५ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ भारतीय दंड संहिता अंतर्गत करण्यात आली होती.
चोरीचे प्रमाण आणि गंभीरता लक्षात घेता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फूटेज आणि संशयितांची कसून चौकशी करताना पोलिसांना त्याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे याच्यावर संशय आला.
अत्यंत बुद्धिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा करणाऱ्या दत्ताला पकडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले. तथापि, दोन महिन्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नागपूर येथे लपून बसला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली देत मुद्देमाल कोठे लपवला आहे हेही सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
या यशस्वी कारवाईत मा. रितू खोखर (पोलीस अधीक्षक, धाराशिव), मा. शफकत आमना (अपर पोलीस अधीक्षक) व मा. निलेश देशमुख (उप. पोलीस अधीक्षक, तुळजापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, अण्णासाहेब मांजरे (पो.नि. तुळजापूर), सचिन खटके (स.पो.नि.), अमोल मोरे (स.पो.नि.) तसेच विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, बबन जाधवर, मेहबुब अरब, प्रकाश बोईनवाड, सुभाष चौरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.