प्रतिनिधी / ढोकी
अपघाताच्या घटनांनी लातूर -टेंभुर्णी महामार्ग जीवघेणा ठरला आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लातूर तालुक्यातील मुरुड येथील लक्ष्मीकांत तवले मंगळवारपासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत. दरम्यान, या उपोषणकर्त्याना पाठिंबा म्हणून आणि महामार्गाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ढोकीसह परिसरातून जनआंदोलन उभारण्याचा निर्णय शनिवारी ढोकी ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथून लातूर ते टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ जातो. गेल्या दोन दशकापासून हा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढली असून, मुरुड ते येडशी दरम्यान गेल्या दोन वर्षात झालेल्या अपघातात मृताची संख्या शंभरावर गेली आहे तर अनेक लोकांना अपंगत्व आले आहे. या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे,या मागणीवर विचार विनिमय करण्यासाठी ढोकी ग्रामपंचायतच्या सभागृहात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या तीन-चार वर्षांपासून या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे या मागणीसाठी विविध पातळीवर आंदोलन करणारे मुरुड येथील लक्ष्मीकांत तवले व शिवलिंग चौधरी उपस्थित होते. चौपदरीकरणाच्या मागणीसाठी लक्ष्मीकांत तवले हे १२ डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी झालेल्या बैठकीत लक्ष्मीकांत तवले यांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची रूपरेषा सांगितली तसेच महाराष्ट्र शासनाने नुकत्याच संभाजीनगर येथे १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत लातूर ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली असली तरी अद्यापही शासन स्तरावर कोणत्याही हालचाली नाहीत म्हणून शासन दरबारी आवाज उठविल्याशिवाय आपल्या पदरात काही पडणार नसल्याचे सांगून यापुढे आपल्याला तीव्र आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे सांगून या मार्गावर येणाऱ्या लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील गावांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला तरच आपल्या मागणीचा रेटा वाढेल म्हणून सर्व गावांनी सहभागी व्हावे , अशी विनंती केली. यावेळी मुरुड येथील शिवलिंग चौधरी, उपसरपंच अमोल समुद्रे, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, राहुल वाकुरे,नासेर शेख,दौलत गाढवे,प्रमोद जोशी आदींनी आपले विचार मांडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल देशमुख, पांडुरंग वाकुरे, शकील काझी, जुबेर पठाण, प्रभाकर गाढवे,हसन शेख,इमरान शेख, सुरेश कदम, अरुण देशमुख, रामेश्वर पवार, प्रमोद कदम,अंकुर अपसिंगेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाशी निगडित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उपोषणाला ढोकीकरांचा पाठिंबा
मुरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असलेले व लातूर- टेंभुर्णी या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रयत्न करणारे लक्ष्मीकांत तवले हे अन्यायग्रस्त मराठवाड्याला न्याय द्या या मागणीखाली मुरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १२ डिसेंबरपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांनी शासनाकडे लातूर ते टेंभुर्णी या मार्गाचे चौपदरीकरण करताना आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या धर्तीवर नांदेड- लातूर- पंढरपूर हा दिंडी मार्ग म्हणून विकसित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या उपोषणाला ढोकीकरांनी पाठिंबा दर्शविला आहे.