पत्रकार नम्रता वागळे यांचा परखड सवाल, कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान कार्यक्रम थाटात
शाम जाधवर / कळंब
तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्र झाल्याचा आरोप आपल्या या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर का होतो आहे, आपण खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलो आहोत का, याचा विचार पत्रकारांनी करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत नम्रता वागळे यांनी मांडले.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला. कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे 25 वे वर्ष होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर तर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, पत्रकार तथा कवी रवींद्र केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या म्हणाल्या, प्रश्न सोडवण्यासाठीचे माध्यम होणे आपल्याला जमले पाहिजे. फक्त टीआरपी वाढवण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे. मी जे करतोय ते बरोबर आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारु शकणारा व्यक्तीच खरा पत्रकार असतो. एखाद्या घटनेतील फक्त बातमीच आपल्यासाठी महत्त्वाची असते त्याचा भावनिक विचार करून किंवा स्वतः भावनिक होऊन चालत नाही,आपल्या मातीतील, ग्रामीण माणसातील बातम्या करण्याचे सौभाग्य तुम्हा ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळाले आहे, ते भाग्य आम्हा इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये मुंबई – पुण्याला काम करणाऱ्यांना नाही.पत्रकाराला एखाद्या बातमीतील दोन्ही बाजू मांडण्याचे काम करता आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा व्यक्ती पत्रकार असतो. मराठवाड्यातील नागरिकांना आपण ग्रामीण भागातील आहोत,याचा न्यूनगंड असतो. परंतु हेच ग्रामीण भागातील व्यक्ती प्रतिभावान असतात. त्यामुळे मागासलेपणाचा न्यूनगंड बाळगू नये, आपल्या बोली भाषेला जातीची नाही तर मातीची नाळ जोडलेली असते. असे मत अभय देशपांडे यांनी मांडले.
नैतिक भीतीची जागा दहशतीने घेतली आहे का , याचा विचार करावा लागेल, पत्रकारितेची दुकानदारी करणारे पत्रकारही तयार झालेले आहेत. त्यात सुधारणा करावी लागेल, आपल्या लेखनाची नैतिक भीती वाटली पाहिजे असे पत्रकार घडणे आवश्यक आहे. आपला वैरी आपल्यातच आहे, तो वैरी शोधण्यासाठी दर्पण दिन असतो. समाजाचा एक्सरे आपण काढतो, आपला एक्सरे काढण्याची वेळ आलेली आहे. असे मत पत्रकार तथा साहित्यिक रवी केसकर यांनी मांडले.सत्ताधारी खासदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणून आजकाल एखादे चॅनेल बंद केले जाते हे खेदजनक आहे, असे मत पुरस्कार प्राप्त पत्रकार मुस्तान मिर्झा यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जगदीश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त सतीश टोणगे यांनी केले.
कार्यक्रमाला कळंब शहरातील नागरिक, तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
या सोहळ्यात आफताब शेख (सोलापूर), अतुल कुलकर्णी (बीड), गणेश शिंदे (धाराशिव), निलेश मोहिते (बीड), बालाजी अडसूळ (कळंब), गिरीष जव्हेरी (धाराशिव), मुस्तानभाई मिर्झा (कळंब), अब्दुल माजीद काझी (कळंब) यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
दैनिक देशभक्त आणि दैनिक पुढारी च्या विशेषांकाचे प्रकाशन, तसेच अश्रुबा कोठावळे यांच्या “बालमानांतील शब्द पेरणी” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार व नागरिकांनी याचा लाभ घेतला.
पत्रकार बालाजी अडसूळ भावूक
कै.गणेश घोगरे या नावाने दिला जाणारा पुरस्कार बालाजी अडसूळ यांना दिला त्यावेळी ते भावुक झालेले दिसले. कै. गणेश घोगरे आणि बालाजी अडसूळ यांनी एकाच वेळी पत्रकारिता सुरु केली होती. काळाच्या ओघात मित्र गेला, हयात नसलेल्या मित्राच्याच नावाचा पुरस्कार त्यांच्या या मित्राला मिळाला असे भावपूर्ण मत त्यांनी मांडले.
सेवा समितीचेही पुरस्कार प्रदान
सेवा समिती कळंब मार्फतही पुरस्कार प्रदान
गेल्या १४ वर्षांपासून सेवा समिती कळंब मार्फत पत्रकारांचा आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यामध्ये आजपर्यंत जवळपास ३८ पत्रकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. यावर्षीचे पुरस्कार सेवा समिती कळंब चे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी जाहीर केले होते. त्यात अमर चोंदे (तालुका प्रतिनिधी, दैनिक समय सारथी), आश्रुबा कोठावळे (तालुका प्रतिनिधी, दैनिक अक्षराज), आकिब पटेल (संपादक महाराष्ट्र प्राईम न्यूज) यांना हे पुरस्कार देण्यात आले. संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.