धाराशिव जिल्ह्यातील प्रकार, गंडा,दोरे,काळ्या रंगाच्या बाहुल्या जप्त
गजानन तोडकर / कळंब
आपल्या अंगात देवी असून,भूतबाधा, जादूटोणा करणाऱ्यापासून वाचवतो असे सांगून लोकांवर अघोरी प्रकार करणाऱ्या भोंदू बाबाचा पोलिसांनी भांडफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदू बाबासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून दोरे,गंडे,काळ्या रंगाच्या बाहुल्या आदी जादू टोण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी सांगितले की, अवैद्य व्यवसायाची माहिती मिळवण्यासाठी एम.रमेश यांचे पथक गेल्यानंतर वाशी तालुक्यातील इंदापूर परिसरात सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बोरी शिवारातील हजरत खाँजा शेख फरीद शेकरगंज या दर्ग्याच्या शेजारी एक भोंदु बाबा लोकांना माझ्या अंगात देवी शक्ती असुन, मी जादुटोणा कारणाऱ्यापासून, भुतबाधा होण्यापासुन वाचवितो, असे सांगुन त्यांच्याकडुन अघोरी कृत्य करुन घेवुन तंत्र मंत्रचे सामान काळ्या रंगाच्या बाहुल्या यासाठी प्रत्येक व्यक्तीकडुन २०० ते ३०० रुपये घेत आहे. या प्रकाराची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला.
अघोरी कृत्य करत होता भोंदू बाबा
पोलिसांनी छापा टाकला तेंव्हा एक व्यक्ती येणा-या लोकांना लिंबु, नारळ अंतर, काळया रंगाची बाहुली व मंत्र तंत्राचे सामान विकत असल्याचे आढळून आले तर दुसरा व्यक्ती म्हणजे भोंदू बाबा लोकांवर अघोरी कृत्य करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी भोंदु बाबा शहजारवली ऊर्फ अहमद पाशा सय्यद (३४ वर्षे रा. नांदगाव बोरी ता.वाशी) व साहित्य विक्री करणारा ताजोददीन अहमद शेख ( ४५ वर्षे रा. नांदगाव बोरी ता.वाशी ) या दोघांना ताब्यात घेतले. शहजारवली ऊर्फ अहमद पाशा सय्यद (बाबा) याच्या रुममध्ये व बाहेर दाखविण्यासाठी आलेले १० ते १५ व्यक्ती उपस्थित होते. भोदू बाबा व मदत करणारा व्यक्ती यांच्याकडुन अघोरी उपचाराचे साहित्य व रोख रक्कम असा ५८हजार ७५७ रुपयांचा मुद्देमाल पोनि श्री. दसुरकर यांनी जप्त केला.
यांनी घेतला कारवाईत सहभाग
सदर कामगिरी एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीचे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. दसुरकर,कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पो.उपनि पुजरवाड, वाशी पोलिस ठाण्यातील पोउपनि आर.बी. घुले, पोना शेख, अंभोरे,पठाण,पतंगे,चाटे,सुरवसे,गिराम, पवार आदींनी केली.