सूरज बागल / तुळजापूर
नास्तिक अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल तुळजापूर दौऱ्यात भाविकांच्या भावना जपणारा ठाम पवित्रा घेतला आणि त्यामुळे स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या भाविकांची मने जिंकली.मी हिंदू आहे, तुळजाभवानी देवीवर माझी नितांत श्रद्धा आहे,असे त्यांनी निक्षून सांगितले.
आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मूळ मंदिराचा गाभारा व मंदिराच्या ऐतिहासिक वास्तुला कुठलाही हात लावू नये अशी स्पष्ट भूमिका घेत मंदिर प्रशासनावर जोरदार टीका केली. या मंदिराचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे देवीचे आशीर्वाद घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेतली होती. त्यामुळे मंदिराला कुठेही धक्का लागू देणार नाही, असे आव्हाड ठामपणे म्हणाले.
भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर वाद निर्माण करत त्यांच्या गाडीला अडवले. मात्र आव्हाड यांनी संयम ठेवत भाविकांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. मी नास्तिक नाही. उलट तुळजाभवानी देवीचा भक्त आहे. किमान 250 वेळा या मंदिरात आलो आहे. कुठेही गाजावाजा केला नाही. माझ्या मतदारसंघातही तुळजाभवानी देवीचे मंदिर बांधले आहे, असे सांगून त्यांनी आपल्यावरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
मंदिरातील गाभाऱ्यातील बदलांविरोधात भाविकांशी थेट संवाद साधताना आव्हाड यांनी प्रश्न केला, अशा मंदिराला तुम्ही हात घालू देणार का? यावर जमलेल्या भाविकांकडून जोरदार नाही, नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.
त्यांच्या या वक्तव्यानंतर मंदिराबाहेर भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर टीका करत आव्हाड म्हणाले, भाजपवाल्यांनी माझ्या आंदोलनाकडे पाहून शिकावं. आंदोलन असं असतं, तसं नाही जसं त्यांनी केलं. त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.
राजकीय पार्श्वभूमी
तुळजाभवानी मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही, तर मराठा इतिहासातील अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यातील कोणत्याही बदलावर स्थानिकांचा तीव्र प्रतिसाद उमटतो. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी घेतलेली भूमिका ही केवळ धार्मिक भावनांना हात घालणारी नव्हे, तर मराठा वारशाच्या जपणुकीचा ठाम संदेश देणारी ठरली.
राजकीयदृष्ट्या पाहता, आव्हाड यांनी नास्तिक प्रतिमेला छेद देत धार्मिक भाविकांच्या भावनांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजपने केलेले आंदोलन तुलनेत फिके ठरल्याचा सूर स्थानिक चर्चेत ऐकायला मिळत आहे. आव्हाड यांनी दिलेला ‘टोला’ हा आगामी राजकीय लढाईसाठी वातावरण तापवणारा ठरू शकतो.
स्थानिक पातळीवर कालची घटना ही आव्हाड यांच्यासाठी ‘इमेज बिल्डिंग’ची संधी ठरली आहे.