दोन दिवसांपूर्वीच उमरगा शहरानजीक एका पुलावरून दुचाकीसह नागरिक गेला होता वाहून
आरंभ मराठी / नळदुर्ग
जिल्ह्यात सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू असून, पावसाने जवळपास सगळे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने दुर्घटना घडत आहेत.उमरगा शहरानजीक नदीच्या पुलावरून एक नागरिक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली असताना आता तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या सांडव्यात बुडून एका 25 वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली आहे,या युवकाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.
बोरी धरणाच्या सांडव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला वसीम युसुफ शेख वय (25 रा. हत्ती गल्ली नळदुर्ग) हा युवक पाण्यात वाहून गेल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
सध्या नळदुर्ग येथील बोरी धरण पाण्याने तुडुंब भरले असून, धरणाचा सांडवा सुरु आहे. हा प्रवाहित झालेला सांडवा पाहण्यासाठी नागरिकांची विशेष करून युवकांची मोठी गर्दी होत आहे.
आज रविवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास नळदुर्ग येथील वसीम युसुफ शेख हा युवक मित्रांसोबत धरणाच्या सांडव्यावर पोहण्यासाठी गेला होता.
मित्रांसोबत पोहत असताना वसीम अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सांडव्याच्या खालच्या बाजुला असलेल्या वाघ्याच्या डोहात वसीम वाहून गेला. डोहात पाणी जास्त असल्याने रात्री ९ वाजले तरी वसीमला पाण्याबाहेर काढण्यात यश आले नव्हते. अद्यापही वसीमचा शोध घेण्याचे काम सुरु होते.