टीम आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कळंब तालुक्यातील खोदला गावात आलेल्या पुराने नदीच्या पुलावरून जाणारा शेतकरी पाण्यात अडकला असून, त्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच आमदार कैलास पाटील घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी बचावकार्य गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, रस्ते ठप्प झाले आहेत. कळंब, वाशी, भूम, परंडा तसेच धाराशिव तालुक्यातील अनेक प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. धाराशिव तालुक्यातील तेरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, तर भूम तालुक्यातील संगमेश्वर व पाथरूड मध्यम प्रकल्पही ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक घरांची पडझड होऊन शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जनावरांचे जीवितहानीचीही भीती व्यक्त केली जात आहे. वाशी तालुक्यातील वशिरा नदीला जोरदार पाणी आल्याने पूल वाहून गेला आहे.
जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
पावसामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस व स्थानिक नागरिक मिळून बचाव कार्य करत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असून, संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.