काशी विनोद, रत्नागिरी
- रत्नागिरी भगवती बंदर इथं राहणारा धीरज राजेंद्र साटविलकर. २८ वर्षांचा तरूण. धीरज जन्मतःच अपंग आहे. त्याला दोन हात, एक पाय नाही, मात्र आईवडिलांच्या जिद्दीने त्याला घडवले. धीरजने अपंगत्वावर मात करत पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. २८ वर्षे संघर्ष केल्यानंतर आता धीरजला समाजाचा पाठींबा आणि सहकार्य हवे आहे. त्याला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन आईवडिलांचा आधार बनायचं आहे. हात पाय सर्व अवयव असूनही माणूस अनेक तक्रारी करत असतो. धीरजने मात्र कमकुवत लोकांसाठी एक प्रेरणा बनला आहे.
अष्टपैलू तरुण म्हणून धीरज आज रत्नागिरीत परिचित आहे. अवघ्या तीन वर्षाचा असल्यापासून धीरज एका पायाने सुंदर चित्र काढतो. कॅरम, बुद्धीबळ खेळतो. धीरज छान गातो सुद्धा. अनेक कलागुण असतानाही आज धीरज केवळ दोन हात, एक पाय नाही म्हणून रडत न बसता गेल्या पाच वर्षांपासून नोकरीच्या शोधत आहे. धीरजचे वडील सुतारकाम करतात तर आई गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊही आता नोकरीच्या शोधात आहे.
धीरज गेली अनेक वर्षे विशेष दिनानुसार विविध दिग्गज व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, सेलिब्रिटी, वीर पुरुष यांची चित्रं काढून त्यांना अभिवादन करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या कलेला दाद देणारी माणसं आहेत. काही सणासुदीला आणि उत्सवात धीरज चित्र काढून त्याची विक्री करतो. मात्र अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
धीरज म्हणतो, “मी लहानपणापासून असा आहे त्यामुळे मला स्वतः बद्दल कमी काही वाटत नाही. मी एका पायाने सगळी कामे करतो आणि जिथे अडत तिथे माझे आईबाबा आणि भाऊ मला मदत करतात. प्रोत्साहन देतात. माझ्या कलेने मला जगण्याची प्रेरणा दिली. माझी कला माझ्यासाठी सर्वस्व आहेच पण मला माझ्या आईवडिलांची होणारी ओढाताण कमी करायची आहे.” त्यासाठी नोकरीच्या शोधात असल्याचे धीरजने सांगितले.
धीरजने कायद्याचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न ही केला मात्र काही अडचणीमुळे त्याला हे शिक्षण सोडावं लागलं. कोरोनाकाळात तर धीरजच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. धीरजला चालता यावं म्हणून काही वर्षांपूर्वी जयपुरी फूट बसवण्यात आले आहे. या आधारावर तो आता चालू शकतो. “दोन्ही हात नसताना आयुष्य काढणं किती अवघड आहे या विचारात माणसं खचून गेली असती. धीरज मात्र अपंगत्व असलेल्या लोकांसाठी प्रेरणा बनत आहे हेच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,” धीरजचे आई वडील म्हणतात. (नवी उमेद)