आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षीच्या म्हणजे २०२५ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत धाराशिव शहरातील श्रीकृष्ण गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून मानाचा मुकुट शिरावर चढवला आहे.
ही स्पर्धा जिल्हाभरातून निवडलेल्या गणेश मंडळांमध्ये होत असून सामाजिक संदेश, देखाव्यातील कल्पकता, कलात्मकता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा बारकाईने विचार करून निकाल जाहीर केला जातो. जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता; मात्र श्रीकृष्ण मंडळाने सादर केलेल्या आकर्षक देखाव्याला परीक्षकांनी उच्चांक गुण देत जिल्ह्यात अव्वल क्रमांक दिला.
मंडळाच्या सजावटीत सामाजिक बांधिलकीचा संदेश ठळकपणे मांडण्यात आला होता. यावर्षी मंडळाने सिन्दुर ऑपरेशनवर देखावा सादर केला होता. मंडळाकडून यापूर्वीही पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे विविध पैलू देखाव्याद्वारे साकारण्यात आले होते.
या यशामुळे संपूर्ण मंडळात तसेच धाराशिवकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे यश ही केवळ मंडळाचे नाही तर संपूर्ण शहराचे असून, आगामी काळात राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करून धाराशिवचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या या यशाबद्दल शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्व स्तरातून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.