ग्रामीण भागात डॉक्टर पिता-पुत्रांनी रात्री दोन वाजेपर्यंत केले उपचार
आरंभ मराठी / धाराशिव
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 90 ते 95 जणांना विषबाधा झाली असून, त्रास सुरू झालेल्या रुग्णांना खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात घटना घडल्याने या भागात उपचाराची अपुरी सुविधा असल्याने एका डॉक्टर पिता-पुत्रांनी बुधवारी दुपारपासून रात्री 2 वाजेपर्यंत रुग्णांवर उपचार केले, त्यामुळे अनेक रूग्णांना आधार मिळाला. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समोर आले नसले तरी अन्न व औषध प्रशासनाने पदार्थांचे नमुने तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. ही घटना उमरगा तालुक्यातील कराळी गावात घडली आहे.
कराळी येथील एका कुटुंबात मंगळवारी रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात वडी भाकरी, आंबील, खीर, असा जेवणाचा मेन्यू होता. जेवणानंतर गावकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून,बुधवारी दुपारपासून उलट्या , जुलाब आणि ताप असा त्रास सुरू झाला. त्यानंतर अनेक रुग्ण तुरोरी येथील विजय क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल झाले.
रुग्णामध्ये लहान मुलापासून वृद्धांचा समावेश आहे. दुपारपासून रुग्णाची संख्या वाढत गेली. रात्री 2 वाजेपर्यंत विजय क्लिनिकमध्ये रुग्ण दाखल होत होते. या रुग्णांवर डॉ. विजयकुमार शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉ. विक्रांत शिंदे यांनी उपचार केले, विजय क्लिनिकमध्ये 45 रुग्ण उपचार घेत आहेत.
तसेच उमरगा उपजिल्हा रुग्णालयात 16 व मूळज प्राथमिक आरोग्य केंद्रात 10 रुग्णावर उपचार सुरू आहेत. अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, चिंता करण्याची गरज नाही, असे डॉ.विक्रांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी विजय क्लिनिक तुरोरी येथे भेट देऊन डॉ विजय शिंदे,डॉ विक्रांत शिंदे यांच्याकडे रुग्णाच्या प्रकृतीविषयी चौकशी केली.तसेच आमदार प्रवीण स्वामी यांनी देखील सर्व रुग्णांची चौकशी करून उपचाराबाबत काळजी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
ग्रामीण भागात डॉक्टर पिता-पुत्रांनी दिल्या सुविधा
कराळी गावात जागरण गोंधळ धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील लोकांनी रात्री जेवण केले होते.सकाळपासून गावकऱ्यांना उलटी ,मळमळ,चक्कर येणे,अशी लक्षणे दिसताच एक एक करून तब्बल 45 रुग्ण विजय क्लिनिक तुरोरी येथे दाखल झाले. ग्रामीण भागात असूनही तुरोरी येथे डॉक्टर शिंदे पिता पुत्रांनी सर्व सोईयुक्त दवाखाना सुरू केला आहे.
त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले. डॉ.विक्रांत विजयकुमार शिंदे हे एम डी मेडीसीन असून, त्यांनी वडीलांच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकचा विस्तार वाढवला आहे. मात्र,त्यांनी आरोग्य ही सेवा मानत त्याचे व्यावसायिकरण केले नाही. अनेक गोरगरीब रुग्णांना ते मोफत सेवा देत आहेत. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर पिता-पुत्रांनी बुधवारी रात्री उशिरा म्हणजे दोन वाजेपर्यंत रुग्णांवर उपचार करून सेवा दिली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.