प्रतिनिधी / तेरखेडा
तेरखेडा आणि परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील खरीप पिकांना आधार आणि शेतकऱ्यांना समाधान दिसून आले. मात्र, मागील वर्षाप्रमाणे शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये दिसू लागला आहे. कोवळ्या वयातच पिकावर हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे.
मागील वर्षी हजारो एकर सोयाबीनच्या पिकाला शंखी गोगलगायीमुळे फटका बसला होता. त्याचीच पुनरावृत्ती होते की काय हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती.पाऊस पडत नसल्यामुळे परिसरात मोजक्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. अजूनही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.अशा परिस्थितीमध्ये पेरणी करून उगवून आलेल्या सोयाबीनच्या पिकाला शंखी गोगलगायचा फटका बसत आहे.
तेरखेडा परिसरात संजय जाधवर यांच्या शेतात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला.जमिनीतून उगवून बाहेर आलेल्या पिकाला कोवळ्या आणि नाजूक अवस्थेत असतानाच गोगलगाय या जीवांनी फस्त करून टाकण्यास सुरुवात केली आहे. अशीच अवस्था कायम राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये आहे.
तालुका कृषी अधीक्षक बर्वे यांच्या माध्यमातून परिसरात शंखी गोगलगायीच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून चित्ररथ गावोगावी फिरवून शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात जनजागृती केली जात आहे