जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / धाराशिव
ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची तातडीने दुरस्ती होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. ही बाब टाळण्यासाठी आता शिलकीत ट्रान्सफॉर्मर राहतील, असे नियोजन करण्यात येत असून, प्रत्येक मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बँक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भूम- परंडा – वाशी या मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी वैयक्तिक संस्थेचा 1 कोटी रुपयांचा csr फंड दिला असून आता आमदार फंडातून 1 कोटी रुपये दिला जाणार आहे. त्यामूळे शेतकऱ्यांची ट्रान्सफॉर्मरअभावी गैरसोय होणार नाही.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीवरून गोंधळ आणि ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र लोकप्रतिनिधींनी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करताना हा प्रकार टाळल्याने बैठक सामंजस्याने पार पडली.
बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकास कामांवर तसेच प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली.त्यात ट्रान्सफॉर्मरची समस्या , विमा तसेच अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करून घेतली जात असल्याबद्दल चर्चा झाली. पालकमंत्री डॉ.सावंत यांच्यासह खासदार ओमराजे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले आदी सदस्यांनी शेतकरी प्रश्नावर गांभिर्याने भूमिका घेतली.