अमोलसिंह चंदेल / शिराढोण
सण उत्सव साजरे करताना लागलेली तिव्र ओढ,मात्र झपाट्याने बदलत जाणारी सामाजिक परिस्थिती, यामुळे आपल्या जिवनपध्दतीतही कमालीचा बदल घडत आहे. यामुळे आपोआपच धार्मीक संस्कृतीतही अमुलाग्र बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार मानवाला आनंद मिळवून देणाऱ्या धार्मीक सण, उत्सव यांच्या स्वरूपातही बदल झाले आहेत. बच्चे कंपनीची दिवाळी साजरी करण्यासाठी मामाचे गाव जिव्हाळ्याचे ठिकाण होते, बदलत्या पध्दतीने हा जिव्हाळा संपुष्टात आणला आहे. त्यामुळे दिवाळीत निव्वळ औपचारिकता बाकी उरली आहे.
हिंदु वर्षपरंपरेनुसार अश्विनातले शेवटचे दोन आणि कार्तीकातील सुरूवातीचे दोन दिवस मिळुन चार दिवस साजरा होणारा हिंदु धर्मसंस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. पुर्वी या सणाची चाहुल लागताच घरातील लहान मुलांना ओढ लागयची ती मामाच्या गावाची. कारण पुर्वी घरातील लहान मुलांची दिवाळी साजरी व्हायची ती मामाच्या गावीच. शाळेला सुट्या लागताच आजोबा मुलांना घेवून जाण्यासाठी येत असत व त्यांच्यासोबत मामाच्या गावास जावुनही सर्व बच्चे कंपनी दिवाळीचा आनंद लुटत असत. दिवाळी सणाच्या निमीत्ताने लहान मुलांसाठी मामाच्या गावाकडे जाता-येता होणारा प्रवास हा त्यांच्या दृष्टीने एक प्रकारची सहलच असायचा. दिवाळी साजरी करून परतताना मामाच्या घरून घेतलेले नवीन कपड्याचे या लहान मुलांना वर्षभर कौतूक असायचे. मामाच्या गावातील दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी आनंदाची, उत्साहाची पर्वणीच असायची. परंतू अलीकडील काळात गरज म्हणुन स्वीकारलेल्या गतीमान जिवन पध्दतीत लहान मुलांच्या दिवाळी साजरी करण्याच्या ठिकाणातही बदल झाले असून आपोआपच मामाच्या गावाचे महत्वही कमी झाल्याचे दिसुन येते. वाढत्या शहरीकरणामुळे स्थलांतरीत झालेल्या कुटूंबातील लहान मुलांची मामाच्या गावाची ओढ कमी झाली आहे. त्यामुळे लहान मुलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या मामाच्या गावाच्या रस्त्यावरील गर्दीत ओसरू लागल्याचे चित्र दिसुन येते.पुर्वीच्या काळी संपूर्ण कूटूंब एकाच घरात साजरी होत असे. परंतू अलिकडच्या या आधुनिक काळात नोकरी, कामधंद्यानिमीत्त बाहेर शहरी भागात गेलेले कुंटूंब गावी परत येत नाहीत. आपल्या पारंपारिक वाड्याचा त्यांना विसर पडत आहे.
प्रत्यक्ष संवाद हरवतोय
पुर्वी व्यक्तींमध्ये समोरासमोर चर्चेचे फड रंगायचे.यातूनच दिवाळीसारख्या सणानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव होत असे. परंतू आजच्या गतीमान जिवनात वैयक्तिक शुभेच्छा देण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सोशल नेटवर्कीगच्या अतिरेकी वापरामुळे माणसं मितभाषी बनत आहेत. व्हॉटसअॅपमुळे एकाच वेळी 100 जणांना शुभेच्छा देवून मोकळे व्हावे,असे प्रत्येकाला वाटत असल्याने नात्यांमधील प्रत्यक्ष संवाद हरवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
फराळाचा घमघमाट,पण संवाद बंद
पुर्वी पारंपारीक दिवाळी सणाच्या आठ दिवसांपासून फराळ बनवण्याची लगबग दिसून येत असे. अलिकडच्या काळात फराळ तयार करतानाचा घमामाटही सुरू असला तरी संवाद हरवला आहे. दुसरीकडे आता रेडीमेट फराळ खरेदीवर भर दिला जात आहे. शहारांच्या ठिकाणी अनेक कूटुंबात दिवाळी दिवशी हा रेडीमेट फराळ खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येते.