आरंभ मराठी / धाराशिव
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा एकदाचा सुटला आहे. विधानसभेची ही जागा शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मिळाली असून, जुने शिवसैनिक आणि सध्याचे भाजपा कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
महायुतीकडून उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असताना अनपेक्षितपणे अजित पिंगळे यांचे नाव समोर आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दलच्या चर्चांना ऊत आला होता. डझनभर नेत्यांची नावे वेगवेगळ्या पक्षांकडून आणि समर्थकांकडून रोज चर्चेत येत होती. परंतु यामध्ये अजित पिंगळे यांनी बाजी मारल्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पिंगळे शिवसेना पक्षाकडून इच्छुक होते. परंतु त्यावेळी कैलास पाटील यांना सेनेकडून तिकीट मिळाल्यामुळे पिंगळे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत अपक्ष लढूनही अजित पिंगळे यांनी तब्बल २० हजार ५७० मते मिळवली होती. त्यानंतर अजित पिंगळे यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते सद्या भाजपा चे तालुकाध्यक्ष असून आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी उबाठा गटाचे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. तरीही उमेदवारांच्या मूल्यमापनात अजित पिंगळे यांना झुकते माप मिळाले आहे. मूळचे शिवसैनिक असलेले अजित पिंगळे यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे एकतर्फी वाटणारी ही लढत चुरशीची होणार आहे.
कळंब तालुक्यातून आपल्या शहराला उमेदवारी मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा होती ती पूर्ण झाल्यामुळे कळंबसह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी पिंगळे यांना उमेदवारी
महायुतीकडून तीनही पक्षांकडून अनेक नावे चर्चेत होती. कोणालाही उमेदवारी जाहीर केली तरी महायुतीमध्ये बंडखोरी होईल असे बोलले जात होते. अजित पिंगळे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता कमी आहे. पिंगळे यांनी शिवसेना पक्षात अगोदर काम केलेले आहे. नंतर त्यांनी भाजपात काम करताना आमदार राणा पाटील यांचा विश्वास संपादन केला.
पिंगळे यांचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे महायुतीतील तीनही घटक पक्षांची ताकत अजित पिंगळे यांना मिळू शकते. त्यासोबतच कळंब तालुक्यातून पिंगळे यांना मागच्या निवडणूकीप्रमाणे मते मिळू शकतात असा अंदाज लावून पिंगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.