आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिल्यामुळे विकास आराखड्याच्या कामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांचा हा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा असून, यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर आले असता, त्यांच्यासमोर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरणाचे कौतुक करून काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विकास आराखड्यास तत्वतः मान्यता दिली होती. अखेर आज शिखर समितीने या आराखड्यास अंतिम मान्यता दिली आहे.
सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मंदिराचे प्राचीन रूप तसेच ठेवून मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. तब्बल अठराशे कोटी रुपयांचा हा आराखडा असून, याचे काम पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.
मंदिराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आणि योग्य मावेजा देऊन हा विकास आराखडा राबविण्यात येणार असल्याचे आमदार राणा पाटील यांनी माहिती देताना सांगितले.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विकास आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.