धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गानंतर मराठवाड्याची राजधानी छ्त्रपती संभाजी नगरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे होण्याची शक्यता
आरंभ मराठी / धाराशिव
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रासोबत जोडणाऱ्या धाराशिव -तुळजापूर – सोलापूर या रेल्वे मार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यातच आता धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर हा बीडमार्गे रेल्वे मार्ग करण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे. त्यासाठी लवकरच सर्वेक्षण होणार आहे.त्यामुळे सोलापूर ते छ्त्रपती संभाजी नगर असा दक्षिण-उत्तर रेल्वे मार्ग अत्यंत कमी अंतराने जोडला जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाने जोडल्यास त्याचा धाराशिव जिल्ह्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ असल्यामुळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामुळे धाराशिवकरांना छत्रपती संभाजीनगरला सतत जावे लागते. सध्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय उपलब्ध असला तरी रोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा तासांचा वेळ लागतो. रेल्वेमार्ग झाल्यास हा वेळ कमी होऊ शकतो, तसेच पैशाची देखील बचत होऊ शकते. शिवाय धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी मदत होऊ शकते.
4857 कोटींची गरज
धाराशिव – बीड – संभाजीनगर या रेल्वे कामासाठी ४,८५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा मार्ग २४० किमी आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय कधी निर्णय घेईल याकडे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर ही नवीन लाइन प्रोजेक्ट आरईसीटी सर्व्हे २०१८-१९ मध्ये मंजूर करून त्यानुसार २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला सर्व्हेक्षण रिपोर्ट पाठिवला होता. यावर रेल्वे बोर्ड काय निर्णय घेते, याकडे तीनही जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. धाराशिव ते सोलापूर आणि धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या दोन्ही लाईन सुरू झाल्यास भविष्यात धाराशिव हे मोठे जंक्शन होईल.