प्रतिनिधी / धाराशिव
पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, दुसरीकडे काही रस्ते भुयारी गटारीसाठी खोदून टाकण्यात आले आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्याची अवस्था तर भयंकर झाली असून, दुरुस्तीसाठी चार महिन्यापूर्वी खोदलेल्या या रस्त्यावर खडी आणून टाकली. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आता पावसाने नागरिकांची समस्या अधिकच वाढली आहे. मात्र या छळातून नागरिकांची सुटका होत नाही. या त्रासाबद्दल भारतीय मराठा महासंघ आणि स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. या भागातील चिखलातच भर पावसात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे चौथे मासिक घालून निषेध करण्यात आला.
शहराला चिखल,माती,खड्ड्याची समस्या नवीन नाही. मात्र यावर्षी ही समस्या जीवघेणी ठरत आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे आणि पाण्याचे डोह साचले आहेत. अशा परिस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिकांचा आवाज ना पालिकेपर्यंत पोहोचतोय ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत. त्यामुळे समस्या कायम आहेत. रेल्वे स्टेशन रोडसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर असून या रस्त्याचे काँक्रीटचे काम करण्यासाठी बांधकाम विभागाने रस्ता खोदून टाकला. पुन्हा पुन्हा रोड रोलर फिरवून रस्त्याची दबाई करण्यात आली. त्यानंतर त्यावर खडी पसरून टाकण्यात आली. या खडीच्या पलीकडे दुरुस्तीचे कामच झाले नाही. या भागातील नागरिकांना याच खडीतून मार्गक्रमण करावे लागले.अनेकदा गाड्या घसरून पडल्या,लहान मुले, महिला,वृद्धांना प्रंचड त्रास झाला तरी बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम प्रलंबित ठेवले. पावसाळा सुरू झाल्यानंतर या त्रासात अजून भरच पडली. मात्र तरीही बांधकाम विभागाला घाम फुटला नाही. या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे तक्रार केली. मात्र तरीही बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू केले नाही.
चिखलातच घातली मासिक पूजा
नागरिकांच्या समस्येकडे चार महिन्यापासून दुर्लक्ष केल्याबद्दल बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे चौथे मासिक घालून नागरिकांनी तीव्र निषेध केला. शुक्रवारी सकाळी पडत्या पावसात या रोडवरील जिजाऊ नगर परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मासिकाची रीतसर पूजा मांडण्यात आली. दगडाला हार,फुले वाहून,खाद्य पदार्थ तसेच गुलाल,अगरबत्ती लावण्यात आली. तसेच बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतरही अधिकारी बधले नाहीत तर कार्यालयात घुसून आंदोलन करू,असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संकेत सुर्यवंशी,प्रवक्ते खंडू राऊत, सुमित बागल, भाऊसाहेब देशमुख, शैलेश देशमुख, शाम भन्साळी,शाम पंचमहालकर आदींसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.