आरंभ मराठी/धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात जोरदार ते अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील तापमान वाढल्यामुळे वातावरणात बदल निर्माण झाला आहे.
त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मध्य व मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. या प्रणालीचा प्रभाव विशेषतः धाराशिव, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांवर पडत असून, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या ऊस, तूर आणि सोयाबीन ही प्रमुख खरीप पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. या पावसामुळे ऊस आणि तूर पिकांना काही प्रमाणात ओलावा मिळून फायदा होईल, मात्र ज्या भागांत काढणी सुरू आहे तिथे पिकांची गुणवत्ता घटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या उशिरा होतील, असा अंदाज आहे. धाराशिव परिसरातील केशर आंबा, द्राक्षबागा, डाळिंब आणि पपईच्या बागा सध्या वाढीच्या टप्प्यात आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण झाला असून, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
परिणामी, फळांची गळ, फुगवट्याचे रोग आणि उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने यंदा तब्बल सहा महिने अखंड पाऊस पडत आहे. पारंपरिक शेतीचं चक्र पूर्णपणे विस्कळीत झालं असून, अनेक शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या यलो अलर्ट असला तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती गंभीर झाल्यास धाराशिव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.









