आरंभ मराठी / धाराशिव
एका गावातील 49 वर्षीय महिलेला तिच्या दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, एका 49 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध फसवणूक, लैंगिक अत्याचार व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे नाव व गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अनुसूचित जातीची असल्याचे माहित असतानाही आरोपी तरुणाने तिचा विश्वास संपादन करत सन 2022 पासून ते 8 नोव्हेंबर 2025 पर्यंत विविध प्रकारे तिची फसवणूक केली. तसेच तिला ‘बायकोसारखे’ वागविण्याचे आश्वासन देत तसेच तिच्या दोन मुलींच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घेण्याचे अमिष दाखवत आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
इतकेच नव्हे, तर आरोपीने अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडिता पोलीसांकडे गेल्यास तिला आणि तिच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन दडपशाही केल्याचे आरोप आहेत. या संदर्भात पीडितेने 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 69, 351(2) तसेच अ.जा./ज.जा. प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(व्हिए) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









