तुळजाई नगरी सज्ज, 2 ऑक्टोबरला सीमोल्लंघन
सुरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर: श्री तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवास आजपासून आरंभ होत असून, सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा सुरू होणार आहे.
सोमवार, 22 सप्टेंबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल. दुपारी बारा वाजता घटस्थापना विधी पार पडून नवरात्र महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ होईल. त्यानंतर नऊ दिवस देवीजींच्या विविध अलंकारातील तसेच नित्य महापूजा होणार असून, बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता होम विधी संपन्न होईल तर दुसऱ्या दिवशी, 2 ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा व सीमोल्लंघन सोहळा साजरा केला जाणार आहे.
यंदाच्या नवरात्रात तब्बल 50 लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून शहरात जय्यत तयारी सुरू आहे. आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था, बॅरॅकेटिंग, दर्शन मंडप याची चोख आखणी करण्यात आली आहे. घाटशीळ कार पार्किंग येथे मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. भाविकांना घाटशीळ पार्किंग मार्गे बिडकर पायऱ्या मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातून पायी व वाहनांनी भाविक येतात. त्यासाठी शहरासह सर्व मार्गांवर प्रशासनाने सूचना फलक बसवण्याचे काम हाती घेतले आहे.
नवरात्रात होणार सांस्कृतिक महोत्सव
यंदाच्या नवरात्र महोत्सवात प्रथमच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजाभवानी सैनिकी शाळेच्या आवारात दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत विविध कलावंत आपली कला सादर करणार आहेत. यामुळे भक्तांना धार्मिकतेसोबत सांस्कृतिक आस्वादही मिळणार आहे.
2000 पोलीस व 200 आरोग्य कर्मचारी तैनात
भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा 2000 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. तर आरोग्य सेवेसाठी 200 आरोग्य कर्मचारी तुळजापूर शहरात सज्ज असतील. मंदिर संस्थानचे तब्बल 700 कर्मचारी नवरात्रात आपली जबाबदारी बजावतील. याशिवाय 5 अतिरिक्त मुख्याधिकारी देखील या काळात कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.