आरंभ मराठी / धाराशिव
उसन्या पैशावर जास्त व्याज आकारले म्हणून मित्राच्या घरात चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, पथकाला गुप्त बातमी मिळाली की, पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे नोंद असलेला चोरीचा गुन्हा स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनिल चिलवंत व निखील किरण सोनवणे (सर्व रा. धाराशिव) यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने धाराशिव शहरात शोध घेऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की, या गुन्ह्यातील फिर्यादी शुध्दोधन गायकवाड यांनी आरोपींना उसने पैसे देऊन त्यावर जास्त व्याज आकारले होते. याच रागातून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या कुरणेनगर येथील घरात चोरी केल्याचे सांगितले. आरोपींकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 79 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधव, बबन जाधव, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.









