आरंभ मराठी / धाराशिव
शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून त्यांचे पैसे न देता 23 शेतकऱ्यांची तब्बल 62 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी प्रशांत विलास जाधव (रा. बावी ता. जि. धाराशिव) आणि प्रमोद अशोक माने (रा. सावरगाव ता. तुळजापूर) या दोघांनी दिनांक. 25 ऑक्टोबर 2023 रोजी धाराशिव तालुक्यातील बावी येथे फिर्यादी रविंद्र रंगनाथ उंडे (वय 59 वर्षे, रा.बावी) यांचे व इतर 22 शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले होते.
परंतु, आरोपींनी खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. या व्यवहारात आरोपींनी 23 शेतकऱ्यांची तब्बल 61,93,088 रुपयांची फसवणूक केली. शेतकऱ्यांनी वारंवार पैसे मागूनही त्यांना पैसे दिले नाहीत.
याप्रकरणी फिर्यादी रविंद्र उंडे यांनी दिनांक 10 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोन आरोपींविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं.कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.