चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव: जिल्ह्यावर निसर्गाचा कोपला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांची उभी पिके क्षणात वाहून गेली आहेत. घरेदारे आणि संसार जलमय झाला, जनावरे दगावली, तर अनेकांचे आयुष्यभराचे कष्ट मातीत मिसळले. अजूनही हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.या पार्श्वभूमीवर मदतीची गरज असताना मदतीचे हात तोकडे का पडत आहेत, समाज संवेदनाहीन बनतोय का,असे प्रश्न पडत आहेत.
पूरामुळे गावोगावचे रस्ते, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असले तरी निवाऱ्याची समस्या जाणवत आहे. अन्नधान्य, औषधे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डोकं वर काढत आहे. यातून अनेक शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले असून कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, ही घटना समाजमनाला अस्वस्थ करणारी आहे.
एकट्या मराठवाड्यात तब्बल १० लाख शेतकरी बाधित झाले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, केवळ धाराशिव जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ लाखांवर गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी व कुटुंबं संकटात सापडली असताना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू व्हायला हवा होता. विशेषतः संवेदनशीलतेची खरी कसोटी असताना पश्चिम महाराष्ट्राचे हात रिते का दिसत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
पाच वर्षांपूर्वी जेव्हा सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्याने स्वतःच्या जखमा विसरून मदत फेरी काढली होती. त्या वेळी हजारो टन अन्नधान्य, जनावरांसाठी चारा आणि आवश्यक साहित्य धाराशिव जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला पोहोचले होते.
मात्र आज धाराशिव जिल्ह्यावर आभाळ कोसळले आहे, हजारो कुटुंबं उघड्यावर आली आहेत, तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे हात रिते का पडले आहेत ? समाजाच्या संवेदनशीलतेला काय झाले आहे ? माणुसकीची भावना बोथट झाली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
धाराशिव जिल्हा कायमच निसर्गाच्या लहरींना तोंड देत आला आहे, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी पिकांच्या बाजारभावाचा प्रश्न आहे. या सर्व संकटांतही धाराशिवच्या जनतेने इतरांना मदतीचा हात पुढे केला. जिल्ह्याला संपूर्ण राज्यातील नागरिकांची, संस्था-समाजकार्यकर्त्यांचीतसेच लोकप्रतिनिधींची साथ हवी आहे.
सध्या या भागात अन्न, वस्त्र, निवारा यांची तातडीची आवश्यकता आहे. परंतु दीर्घकालीन दृष्टीने विचार करता शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार, बी-बियाण्यांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व आरोग्य सुविधा, तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने योजना राबविण्याची आवश्यकता आहे.