आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका मुलीवर धमकावून अत्याचार केला आहे तर दुसऱ्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे यातील अत्याचार केलेली चौदा वर्षीय मुलगी पाच महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या घटनेत परंडा तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) हिच्यावर नऊ महिन्यांपूर्वी पासून ते 19 एप्रिल 2025 पर्यंत अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना एका तरुणाने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
यामध्ये ती मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिली आहे. तसेच त्याबद्दल कोणाला सांगितल्यास तुझ्या आई वडीलांना जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. पिडीत मुलीने 22 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-65(1), 64(2)(एफ),64 (2)(एच), 64(2)(एम), 351(3) सह पोक्सो कलम 6, 10, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत लोहारा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय मुलीवर दिनांक 1 मे 2025 ते 22 मे 2025 दरम्यान गावातील एका तरुणाने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2)(आय), 64(2)(एम), 65(1),137(2) सह पोक्सो कलम 4, 6, सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1), (डब्ल्यु) (i)(ii) 3(2) (व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जिल्ह्यात या दोन्ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे.