प्रत्येक उत्सवात दणदणाट,शहरात येण्यापूर्वीच डीजे का अडवले जात नाहीत, सुजाण नागरिकांनो, भूमिका कधी घेणार ?
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव
धाराशिव शहरात हल्ली कोणताही उत्सव डॉल्बीशिवाय साजरा होत नाही. डॉल्बीचा दणदणाट इतका वाढलाय की, उत्सवाचे रूपांतर उन्मादात झाल्याचे चित्र आहे. कोणत्याही महापुरूषांनी, देवदेवतांनी दिलेला विचार समजून घ्यायचा नसेल तर उन्माद होणारच. नुकत्याच पार पडलेल्या रामनवमीच्या मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजाने शहरवासियांच्या कानठळ्या बसल्या, या आवाजाने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढले.
त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे धाराशिवकरांचा केवळ सोशल मिडियावर संताप पहायला मिळाला. पण याविरोधात प्रशासनापर्यंत कुणी पोहोचले नाही. त्यामुळे प्रतिबंध कसा आणि कोणी घालायचा, हा खरा प्रश्न आहे. आमच्या कार्यक्रमातच तुम्हाला डीजे दिसतो का, असे प्रतिप्रश्न करून जात किंवा धर्माच्या आडून सोयीस्करपणे मुक्त होण्याची संधी कोणीही सोडत नाही. त्यामुळे शहर डॉल्बीमुक्त कसे होणार, यासाठी कोण पुढाकार घेणार, सुजाण नागरिक कधी पुढे येणार, यांसारखे प्रश्न निर्माण होत आहे.
आतातरी थांबवा हे प्रदर्शन
पोलिस खात्याकडे असलेल्या नोंदीनुसार जानेवारी ते डिसेंबर या पूर्ण वर्षभरात शहराच्या विविध भागात तब्बल पन्नासच्या आसपास मिरवणुका निघतात. यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा लागतो. आता या प्रत्येक मिरवणुकीत नियमानुसार ‘डीजे’चे एक किंवा दोन बेस (म्हणजे साऊंड बॉक्स) लावता येतात. तसेच या दोन्ही बेसचा मिळून आवाज हा ४५ ते ५५ डेसिबलपेक्षा कमी असावा लागतो.
कारण इतकाच मोठा आवाज मानवी कान सहन करू शकतो. धाराशिवमधील सर्वच म्हणजे ५० मिरवणुका या मुख्य म्हणजे रहदारीच्या मार्गावरून जातात. म्हणजे याठिकाणी रहिवासी घरे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मंदिरे आहेत. या सर्व ठिकाणच्या प्रत्येक जीवाला शांतता महत्त्वाची असते. नेमके याच ठिकाणी वर्षभर मिरवणुकांचा हैदोस सुरू असतो. प्रत्येक मिरवणुकीत सरकारी नियम धाब्यावर बसवून तब्बल सहा ते १२ बेस (साऊंड बॉक्स) वापरण्यात येतात.
त्यातून बाहेर पडणारा आवाज हा तब्बल १०० ते ११० डेसिबल असतो. जो की सर्वसामान्य माणसाच्या श्रवणशक्तीला घातक ठरू शकणारा असतो. अशावेळी मिरवणुकीत सहभागी नसलेल्या, परंतु मिरवणूक मार्गावर असलेल्या प्रत्येक माणसाने जावे तरी कुठे अन् कितीवेळा, कितीकाळ हा प्रश्न उरतो. त्यातच लहान मुले, हृदयविकार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना होणाऱ्या त्रासाचा कोणी विचारच करत नाही.
त्यामुळे अख्ख धाराशिव शहर बहिरं होतंय, आतातरी ‘डीजे’ शांत करा हे सर्वांनीच ओरडून सांगण्याची वेळ आलीय. मिरवणूक काढणाऱ्या तरुण मंडळांच्या प्रत्येक सदस्यांच्या जाणिवा, भावना इतक्या बोथट झाल्या आहेत का, की त्यांना स्वतःच्या चित्रविचित्र नाचण्याशिवाय काहीच सुचत नाही.
राजकीय नेत्यांसह नागरिकांनी भूमिका घ्यावी –
शहरातील सर्व मिरवणुका राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच निघतात. राजकीय नेत्यांनी दिलेल्या लाखोंच्या देणग्यांमुळे डॉल्बीचा दणदणाट वाढतो. नियमानुसार मिरवणुकीत ‘डीजे’चा आवाज ४५ ते ५५ डेसिबलपेक्षा कमी हवा; मात्र धाराशिवमध्ये हा आवाज १०० ते ११० डेसिबल पर्यंत असतो.
याविरुद्ध अगोदर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. वर्गणी देताना डॉल्बी न लावण्याची तंबी राजकीय नेत्यांनी द्यायला हवी. तसेच सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिकांनी देखील या प्रकरणी समोर येऊन प्रयत्न करायला हवेत. पोलिसांसह विविध विभागांनी देखील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी. तरच यावर निर्बंध येऊ शकेल.