आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील बऱ्याच भागात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अवघ्या चार तासांत तब्बल 152 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शेतीपीकांसह नदीकाठच्या घरादारांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता. हा पाऊस मुख्यत्वे तडवळा, ढोकी, तेर, खेड, खामगाव, जागजी, ढोराळा, रुई, गोवर्धनवाडी या भागात नुकसानकारक ठरला. काल सायंकाळी 5 ते 9 दरम्यान गोवर्धनवाडी परिसरात पडलेल्या पावसाची नोंद 152 मिमी इतकी आहे.
यावरून पावसाचा कहर किती मोठा होता याचा अंदाज लावू शकतो. या पावसामुळे धाराशिव ते लातूर हा राज्यमार्ग रुई ढोकी येथे बंद झाला होता. रुई येथील पुलावर जवळपास चार फूट पाणी साचल्यामुळे रात्री दहा वाजता हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता.
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रुई ढोकी येथील पुलावरून एक चारचाकी गाडी तेरणा नदीत वाहून जात होती. मात्र तिथे उपस्थित काही तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून गाडी पाण्याबाहेर काढली. सध्या हा मार्ग वाहतुकीस पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
अनेक भागात मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर येत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नाल्यांजवळ व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार कैलास पाटील आणि आमदार राणा पाटील यांनीही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
काही दुर्घटना घडल्यास तात्काळ कळविण्याचे देखील दोन्ही आमदारांनी आवाहन केले आहे.
हवामान विभागाने आजदेखील मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तेर येथे तेरणा नदीने रौद्ररूप घेतल्यामुळे काही घरात पाणी शिरले आहे.
या पावसामुळे शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाताशी आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचे पाणी वावरातच असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. शासकीय यंत्रणेकडून तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.