जून महिन्यात सरासरीच्या केवळ 78 टक्के पाऊस
पावसाने हुलकावणी दिल्यामुळे 30 टक्के पेरण्या खोळंबल्या
आरंभ मराठी / धाराशिव
मे महिन्यात तुफान बरसलेला मान्सूनपूर्व पाऊस जून महिन्यात मात्र अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तब्बल पंधरा दिवस सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा परतला असला तरी अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.
धाराशिव जिल्ह्यात तब्बल 300 मिमी पाऊस मे महिन्यातच पडला. त्यामुळे जून महिन्यात देखील चांगला पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र जून महिन्यात सरासरीच्या केवळ 78 टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात देखील पावसाचे प्रमाण संमिश्र असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या रुपात प्रचंड पाऊस पडला. हा पाऊस हंगामातील एकूण पावसाच्या निम्मा होता. त्यामुळे ओढे, तलाव आणि जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात देखील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला.
यावर्षी मृग नक्षत्र निघण्यापूर्वीच जिल्ह्यातील 40 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मृग नक्षत्रात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. मात्र पाऊस पडेल या आशेवर बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पाऊसच पडला नाही आणि काही भागात दुबार पेरणीचे संकट आले.
धाराशिव तालुक्यात जून महिन्यात उमरगा आणि लोहारा हे दोन तालुके वगळता इतर सहा तालुक्यात सरासरीइतका देखील पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीन या प्रमुख नगदी पिकाच्या उगवण क्षमतेवर मोठा परिणाम झाला.
जून महिन्यात धाराशिव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 54 टक्के पाऊस झाला. तर लोहारा तालुक्यात सर्वाधिक 180 टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील 70 टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, अजूनही 30 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे.
जुलै महिन्यात देखील पावसाचा अंदाज फारसा समाधानकारक नसल्यामुळे बळीराजासमोर संकट उभे राहणार आहे. सध्या पंधरा दिवसांनी पाऊस पुन्हा परतला असला तरी पावसाने अजूनही जोर पकडला नसल्यामुळे पेरण्या खोळंबलेले शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. उगवून आलेल्या पिकांना रिमझिम पावसामुळे संजीवनी मिळाली असली तरी या पावसामुळे खरीप पिकांवर रोगराईचे देखील संकट येत आहे.
नक्षत्र काय सांगतात
पुनर्वसू : वाहन घोडा
शनिवार (दि. ५ जुलै) उत्तर रात्री पाच वाजून ४७ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन घोडा आहे. या नक्षत्रात मध्यम प्रमाणात सर्वत्र पाऊस होण्याची चिन्हे आहेत. या नक्षत्रातील पावसाला तरणा पाऊस असेही म्हणतात.
पुष्य : वाहन मोर
शनिवार (दि. १९ जुलै) उत्तर रात्री पाच वाजून २१ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन मोर आहे. अनेक ठिकाणी उत्तम पाऊस होईल. काही भागात पूर येण्याची शक्यता आहे. या पावसाला म्हातारा पाऊस असेही म्हणतात.
जुलै महिन्यात देखील संमिश्र पाऊस
इंटर ट्रॉपिकल काँनवर्झन झोन हे उत्तरेला सरकले आहे. पश्चिम किनारपट्टीला ऑफशर ट्रफ सक्रिय आहे. अरबी समुद्रात् सध्या कोणतीच हालचाल नाही. बंगालचा उपसागर सध्या सक्रिय असून एक कमी दाब सध्या विकसित असून तो उत्तर पश्चिम मार्गे जमिनीवर येऊन उत्तरेत खुप मोठ्या भागात पाऊस देत आहे.
सद्य स्थितीत बंगालच्या उपसागरात एकामागोमाग एक असे तीन कमी दाब येतील असा अंदाज आहे. जुलै महिन्यात पहिले दहा दिवस हलका पाऊस राहील तर त्या पुढील दहा दिवस उघडीप मिळेल अशी शक्यता आहे.
शेवटच्या दहा दिवसांचा अंदाज पहिला असता या कालावधीत मान्सून ट्रफ थोडीशी दक्षिण भागात सरकेल त्या वेळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाब महाराष्ट्रातून जातील असा अंदाज आहे. जुलै महिन्यातील शेवटचे दहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत जुलै महिन्यात संमिश्र स्वरूपात पाऊस राहील असा अंदाज आहे.
सुरज जयपाल जाधव
हवामान अभ्यासक
रूईभर, धाराशिव.
जून महिन्यात पडलेला पाऊस
तालुका – जूनमध्ये होणारा पाऊस (मिमी) – प्रत्यक्ष झालेला पाऊस (मिमी) – टक्केवारी
1) धाराशिव – 133 – 72 – 54%
2) तुळजापूर – 118 – 119 – 100%
3) परंडा – 112 – 78 – 70%
4) भूम – 131 – 72 – 55 %
5) कळंब – 133 – 82 – 61%
6) उमरगा – 111 – 124 – 112%
7) लोहारा – 109 – 196 – 180%
8) वाशी – 125 – 98 – 77 %
9) एकूण – 127 – 99 – 78 %