आरंभ मराठी / धाराशिव
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच खात्यात लाचखोरी शिरली असून, आज त्यांच्या खात्यातील एका अभियंत्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
धाराशिव जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा अभियंता शशिकांत उबाळे यांना दहा हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. बस स्थानकातील कामाचे कंत्राट देण्यासाठी ही लाच देण्यात येत होती.
अभियंता असणारे उबाळे हे कामाच्या बदल्यात लाच मागत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आज सकाळी अकरा वाजता बस स्थानकात ही कारवाई केली. ही घटना राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याच कार्यक्षेत्रात घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून उबाळे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दहा कोटी रुपयांचे धाराशिव येथील बस स्थानक कोणत्या न कोणत्या प्रकारे वादात सापडले आहे. याच बस स्थानकाचे एक काम देण्यासाठी ही लाच घेतल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याच खात्याचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यामुळे हा मुद्दा चांगलाच तापणार आहे.