आरंभ मराठी / धाराशिव
रविवारी सर्वत्र उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली. धाराशिव शहर आणि जिल्ह्यात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, दुपारनंतर धाराशिव शहरात डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने रामनवमीच्या उत्साहाचे रूपांतर उन्मादात झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
रामनवमी निमित्त काढलेल्या मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बीच्या आवाजाने शहरवासीयांना हैराण करून सोडले. दुपारनंतर शहरभर डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. डॉल्बीवर बंदी असतानाही काही तरुणांनी कायद्याचे उल्लंघन करून आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन केले.
याप्रकरणी काही नागरिकांनी पोलीस स्टेशनला फोन करून देखील डॉल्बी विरोधात कारवाई करण्याची विनंती केली होती. अखेर धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आता डॉल्बीच्या विरोधातील धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात डॉल्बीच्या विरोधातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी उशिरा पाच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी दिली. यामध्ये सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी संदीप अप्पाराव पवार, शुभम नवनाथ कांबळे, शुभम देवानंद कांबळे, शुभम राजू मुद्दे आणि प्रशिक भारत गंगावणे (सर्व रा.
धाराशिव) यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सर्व सण उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या आणि मिरवणुका डॉल्बीमुक्त वातावरणात कराव्यात अशी विनंती केलेली आहे.
सामान्य नागरिकांना मिरवणुकांचा त्रास होता कामा नये याची आयोजकांनी दक्षता घ्यावी असेही आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.