मात्र संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास सुरू
आरंभ मराठी / कळंब
मनीषा बिडवे-कारभारी ही ४५ वर्षांची महिला कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत राहत होती. २७ तारखेला तिच्या राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते.
काल या हत्येतील मुख्य दोन आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर या हत्येचा संबंध संतोष देशमुख हत्ये प्रकरणाशी आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी संतोष देशमुख प्रकरणाशी महिलेचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी पोलिसांचा तपास मात्र त्याच दिशेने सुरू असल्याचे समजते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कळंबची मृत महिला ही संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेली महिला असून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. मात्र पोलिसांनी या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी सबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी मिळालेले पुरावे, फोन कॉल्स याच्या माध्यमाने पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला होता. द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हिचे मारेकरी अखेर पोलिसांना सापडले आहेत.
रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या दोन आरोपींना अटक केली आहे. उस्मान सय्यद याला संशयित म्हणून तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी केज येथून ताब्यात घेतले होते. तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ रामा भोसले ज्याने प्रत्यक्षात खून केला तो पोलिसांना गुंगारा देत होता. आळंदी, पुणे, मिरज, गोवा, कर्नाटक या ठिकाणी तो फिरत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपीनिय माहिती मिळाली की, तो येरमाळा येथे आलेला आहे. सापळा रचून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सुरुवातीला एलसीबीच्या पोलिसांनी उस्मानला ताब्यात घेतले.
त्यानंतर तपासाचा धागा पकडत मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याला देखील अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहानखान पठाण, जावेद काझी या पोलीस पथकाने आरोपींना पकडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
मृतदेहासह आरोपी दोन दिवस राहिला –
रामेश्वर भोसले नावाचा तरुण मनीषा बिडवे हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून काम करत होता. तो सुरुवातीला तिचा ड्राइव्हर होता. नंतर संबंधित महिलेसोबत त्याचे सबंध जुळले. कांही दिवसांनी ती महिला त्याला त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून मानसिक त्रास देऊ लागली. गुन्हा दाखल करायची धमकी देऊन त्याचा छळ करायला लागली. महिला दररोज रामेश्वरला मारहाण करून त्याचा शारीरिक छळ करत होती. घटनेच्या दिवशी म्हणजे २२ मार्च रोजी तिने त्याला १०० उठाबशा काढायला लावल्या होत्या. या सगळ्या त्रासातून त्याने तिच्या डोक्यात वार केला.
या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर संबंधित आरोपी दोन दिवस मृतदेह असलेल्या घरात राहिला. तो जेवण ही तिथेच करायचा. तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने आरोपीने गाडी घेऊन पोबारा केला. केज येथील आपल्या उस्मान सय्यद नामक मित्राला घटनेच्या ठिकाणी द्वारका नगरी येथे आणून मृतदेह दाखवला. दोघेही सुरुवातीला पुरावे नष्ट करायला आल्याचे समजते.
संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध नाही –
या गुन्ह्यामध्ये सध्या रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद असे दोन आरोपी ताब्यात घेतलेले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. सध्यातरी संतोष देशमुख प्रकरणाशी या हत्येचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे त्या प्रकरणाशी महिलेचा संबंध असल्याचे ठामपणे सांगता येत नाही.
रवी सानप,
पोलीस निरीक्षक, कळंब.