आरंभ मराठी / धाराशिव
दरोडा, जबरी चोरी सारख्या तब्बल 17 गुन्ह्यातील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 25 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे स पो नि कासार व त्यांचे पथक हे धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणे, तसेच फरारी आरोपी यांचा शोध घेण्यासाठी गस्त करत होते.
त्यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धाराशिव पोलिसांना दरोडा, जबरी चोरी सारख्या अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला कुख्यात आरोपी मोतीराम उर्फ कुक्क्या बादल शिंदे (रा. मोहा तालुका कळंब) हा काही कामानिमित्त धाराशिव शहराकडे येत आहे.
मिळालेल्या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ वरुडा पुलाजवळ सापळा लावून कुक्या याला शिताफिने ताब्यात घेतले. कुक्या वर धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो एकूण पाच दरोडा, एक जबरी चोरी, एक दरोड्याचा प्रयत्न आणि दहा मोटरसायकल आणि डिझेल चोरीचे गुन्हे अशा एकूण 17 गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता.
त्याने पोलिसांना अनेक दिवसापासून गुंगारा दिला होता. परंतु अखेर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला शिताफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोस्टे ग्रामीण यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर, पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना अप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार स्था गुन्हे शाखा पोहेका शौकत पठाण, पोहेका जावेद काझी, पोहेका प्रकाश औताडे, पोहेका फरहान पठाण,चापोका नितीन भोसले, चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.