प्रतिनिधी / धाराशिव
उच्च न्यायालयाच्या 18 डिसेंबरच्या परिपत्रकानुसार उस्मानाबाद न्यायालयाचे नामांतर धाराशिव न्यायालय असे करण्यात आले असून याबद्दल विधिज्ञांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव असे करण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या सूचनेनुसार नामांतराची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक प्रशासकीय संस्थेला संबधित वरिष्ठ कार्यालयाकडून स्वतंत्र परिपत्रकाची आवश्यकता असते. त्यानुसार उच्च न्यायालयाने 18 डिसेंबर रोजी परिपत्रक काढून उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्हा न्यायालयाचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज गुरूवारी सकाळी उस्मानाबाद न्यायालय नामफलक हटवून धाराशिव न्यायालय असे करण्यात आले. त्यामुळे जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अँड रविंद्र कदम,उपाध्यक्ष अँड शिरीष गिरवलकर,अँड हेमंत शेरकर, कोषाध्यक्ष अँड प्रदीप टेळे, वरिष्ठ विधिज्ञ अँड राम गरड,अँड नितीन भोसले,अँड देवळे,अँड वट्टे ,पांडुरंग लोमटे,दयानंद बिराजदार,धैर्यशील सस्ते आदी विधीज्ञ उपस्थित होते.