प्रतिनिधी / धाराशिव
हिट अँड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी चालक संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला असून, या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर जिल्हाभर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान, या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरील इंधन संपल्याने वाहनधारकांची कसरत झाली. इंधन असलेल्या काही पंपावर मात्र प्रचंड गर्दी झाली होती.
वाशीमध्ये तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी / वाशी
भारत सरकारने नवीन केलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जय संघर्ष चालक वाहक संघटनेच्या मंगळवारी (दि.२) रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले.
वाहनाचा अपघात झाल्यावर जखमींना जाणीवपूर्वक कोणताही चालक सोडून पळून जात नाही. अपघातस्थळी स्थानिकांकडून चालकाला होणारी अमानुष मारहाण या भीतीपोटी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चालक अपघातस्थलावरून पलायन करत असतो. त्यामुळे चालकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्य देऊन अगोदर सरकारने अपघातस्थळी चालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा आणावा आणि मंजूर केलेल्या हिट अँड रन कायद्यातील शिक्षा आणि दंड कमी करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष आबासाहेब चेडे, सुधीर गवारे, अशोक निकम, गणेश धुमाळ, सचिन शिंदे, नानासाहेब थोरबोले, बाजीराव करडे, रामजी क्षीरसागर यांच्यासह चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.