धाराशिव शहरातील धक्कादायक प्रकार, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिकेवर आरोप
प्रतिनिधी / धाराशिव
हृदयविकाराच्या झटका आलेल्या तरुणाला भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रुग्णालयात नेण्यासाठी विलंब लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून, पालिकेच्या अक्षम्य चुकांमुळे ही योजना कशी जीवावर बेतत आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने येऊ लागला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्यांवर खड्डे आणि चिखल असून, नागरिकांचा त्रास वाढतच आहे.
अमित भारत पुंडपल ,असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजपने म्हटले आहे की, धाराशिव शहराच्या विविध भागात अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. पाईप टाकल्यानंतर मुरूम व्यवस्थित न टाकता अर्धवट खड्डे बुजवण्यात आले असून, त्यामुळे पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. अमित पुंडपल यास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी घेऊन जात असताना अंडरग्राउंड ड्रेनेजच्या उखडलेल्या रस्त्यामुळे त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यास विलंब झाला आणि यातच त्याचा दुर्दैव मृत्यू झाला. ही माहिती मिळतच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाद्यक्ष नितीन काळे यांनी पुंडपल यांच्या निवासस्थानी भेट देउन नातेवाईकांचे सांत्वन केले.
शहराच्या सर्वच नागरी वस्त्यांमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजच्या कामामध्ये अनियमितता झाली असल्यानेच उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी या भागातील रस्त्यांची पाहणी करुन प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, अभिजित काकडे, दत्ता पेठे, अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकाराने भुयारी गटार योजना आणखी जणांच्या जीवावर बेतणार,पालिका किती डोळेझाक करणार असे सवाल विचारले जात आहेत.