आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या आज (दि.१६) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी विजय मिळवला. नगरपालिकेतील संख्याबळ पाहता ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता होती; मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली.
उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अक्षय ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून अक्षय जोगदंड यांनी अर्ज दाखल केला. दोन अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. झालेल्या मतदानात अक्षय ढोबळे यांनी अक्षय जोगदंड यांचा १३ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत अक्षय ढोबळे यांना भाजपच्या २२ नगरसेवकांची मते तसेच नगराध्यक्षांचे एक मत मिळून एकूण २३ मते मिळाली. तर अक्षय जोगदंड यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ मिळाली असून काँग्रेस पक्षाची तीन मते त्यांच्या बाजूने पडली. त्यांना १० मते मिळाली.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे २२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ७, काँग्रेसचे ३ तर एमआयएमचा १ नगरसेवक निवडून आला आहे. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नगरपालिकेतील चारही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या कालच पूर्ण झाल्या. यामध्ये भाजपकडून अमोल राजे निंबाळकर आणि सुजित साळुंखे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पंकज भोसले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंकज जयंतराव पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदी भाजपकडून कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अनेक संभाव्य नावातून अखेर अक्षय ढोबळे यांनी बाजी मारली. नगराध्यक्ष पदासाठी देखील अक्षय ढोबळे यांच्या पत्नी पूर्वा अक्षय ढोबळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष बनवले आहे. धाराशिव नगरपालिकेत मागील चार वर्षांपासून प्रशासक कारभार हाकत आहेत. चार वर्षानंतर आता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळाल्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.










