आरंभ मराठी / धाराशिव
उमरगा आणि लोहारा तालुक्यातील 80 हजार शेतकऱ्यांना अखेर आठ महिन्यांनी न्याय मिळाला असून, आज राज्य सरकारने अतिवृष्टी अनुदानापोटी दोन तालुक्यांना 86 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
यासंदर्भात शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सतत पाठपुरावा करून ही मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
विशेषतः सोयाबीन पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारकडे कृषी विभागाने दोन वेगवेगळे अहवाल सादर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली होती.
त्यातील पहिला प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून मदत जाहीर केली होती. मात्र, उमरगा व लोहारा तालुक्याचा दुसरा प्रस्ताव तसाच पडून होता. त्या प्रस्तावाला अखेर आज (दि.29) राज्य सरकारने मंजुरी दिली.
त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. पुढील काही दिवसात ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.