आरंभ मराठी / धाराशिव
राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा सातवा हप्ता कधी वितरित होणार आहे,याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.अखेर या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
जुलै महिन्यात मिळणारा हा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करत होते. मध्यंतरी ही योजना बंद पडल्याच्या देखील बातम्या येत होत्या. मात्र, राज्य सरकारने दिनांक 3 सप्टेंबर रोजी राज्यातील 92 लाख 30 हजार पात्र शेतकऱ्यांसाठी 1932 कोटी रुपयांची तरतूद केली.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. 9 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याच्या रूपाने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार असून त्यामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना मोठी मदत मिळणार आहे.
या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळतात. केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फे अतिरिक्त मदत देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात थेट रोख रक्कम उपलब्ध होऊन आर्थिक बळकटी मिळते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन व कृषी कार्यालयांकडून हप्त्याबाबत सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना जवळपास 50 कोटी रुपयांचे वितरण या योजनेद्वारे मिळणार आहेत.









