धाराशिव / प्रतिनिधी
आरोग्य सेवेचा कणा मानले जाणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे.
कायमस्वरूपी सेवेत समावेश व इतर मागण्यासाठी शासनाविरोधात आजपासून ( १९ ऑगस्ट) कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामुळे धाराशिव जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील सेवा विस्कळीत झाली असून, रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत.जिल्ह्यातील साडेआठशे कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
चार महिन्यांपूर्वी तसेच यापूर्वी अनेकवेळा NHM कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळी शासनाने तातडीने मागण्यांचा तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने आश्वासन पाळले नाही.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे संताप अनावर होऊन कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या..?
१० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे.
समान काम समान वेतन हे तत्व तातडीने लागू करावे.
आंदोलनादरम्यान दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
राष्ट्रीय आयुष मिशन, मातृवंदना योजना, HBT, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अभियंते आदी सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे.
EPF, विमा, बदली, लॉयल्टी बोनस यांसारख्या सुविधा तत्काळ लागू कराव्यात.
दीर्घकाळ रिक्त असलेली पदे तातडीने भरून काढावीत.
RBSK अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक डॉक्टर्स, दंतवैद्य, फिजिओथेरपिस्ट आदींना मान्यता देवून नियमित करावे.
जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील BHMS, BUMS डॉक्टरांना योग्य त्या पद्धतीने आरोग्य सेवेत समाविष्ट करावे.
रुग्णसेवा ठप्प
कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांची माती झाली आहे. प्रसूती विभाग, लसीकरण, रक्तपेढी, डायलिसिस, प्रयोगशाळा, JSSK, SNCU, DEIC, NBSU यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. अत्यावश्यक उपचारासाठी रुग्णांना खासगी दवाखान्यांचा मार्ग पत्करावा लागत आहे.