आरंभ मराठी / धाराशिव
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात अचानक हा बदल करण्यात आला असून, अगोदर निश्चित केलेल्या दौऱ्यात बदल करून ते नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतीची पाहणी करणार आहेत.
आज सायंकाळी चार वाजता ते वडगाव (सि.) येथे पाहणी करणार आहेत. तर सायंकाळी पाच वाजता ते तेर आणि परिसरातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ४० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पालकमंत्री सरनाईक हे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कांदा, फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून परिस्थिती जाणून घेणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.