आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ उद्याचा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. मंगळवारी धाराशिव तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, उद्या बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ वाढली आहे.
मंगळवारी धाराशिव तालुक्यातील विविध गटांमधून अनेक उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी तेर आणि केशेगाव या दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संबंधित गटांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आजच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील एकूण 97 इच्छुक उमेदवारांनी 152 कोरे नामनिर्देशनपत्रे खरेदी केली. यापैकी आज तब्बल 115 नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची अधिकृत माहिती आहे. अर्ज खरेदी आणि दाखल करण्याची ही संख्या पाहता अंतिम दिवशी आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांच्या गोटात उमेदवार निश्चिती, आघाड्या आणि युती याबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असून, आज व उद्या कोणकोण रिंगणात उतरणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्जांच्या अंतिम दिवशी धाराशिव तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.









