राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांची आरंभ मराठीला माहिती
धाराशिव जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी फक्त पाच टक्के सोयाबीनचीच हमीभावाने खरेदी
आरंभ मराठी
हमीभाव खरेदी केंद्रांवर आता सोयाबीन विक्रीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण,राज्य सरकारने शक्य तेवढी सोयाबीनची खरेदी केली आहे.
गोदामात जागाच उपलब्ध नसल्यामुळे यापुढे सोयाबीन खरेदीस मुदतवाढ मिळणे अशक्य असून, सरकार आता तूर, हरभरा खरेदीसाठी नियोजन करत असल्याची महत्वपूर्ण माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी आरंभ मराठीला दिली. त्यामुळे नोंदणी केलेल्या परंतु सोयाबीन खरेदी न झालेल्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांच्या पदरी निराश आली आहे.
गुरुवारी (दि.६) हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रास मुदतवाढ द्यावी यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ मिळणे अशक्य असल्याचे पाशाभाई पटेल यांनी सांगितले.
सरकार सोयाबीन खरेदी करण्यास तयार आहे. परंतु खरेदी केलेले सोयाबीन ठेवण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे सोयाबीन खरेदीस मुदतवाढ मिळणे अशक्य आहे. यापुढे सोयाबीन खरेदी सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अवघड होणार आहे. तुरीसोबतच हरभरा खरेदी करण्यासाठी
नाफेडची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता जर सोयाबीन खरेदीस मुदतवाढ दिली तर तूर आणि हरभरा खरेदीचे नियोजन बिघडू शकते. तूर आणि हरभरा ठेवण्यास देखील गोदामात जागा रिकामी ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे सोयाबीन खरेदीस मुदतवाढ मिळणे शक्य नसल्याचे स्पष्ट मत पाशाभाई पटेल यांनी व्यक्त केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांसमोर सोयाबीन विक्रीचे संकट उभे राहिले आहे.
एकूण उत्पादनापैकी केवळ पाच टक्के सोयाबीनची खरेदी
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४ च्या हंगामात एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. सरकारी आकडेवारी नुसार धाराशिव जिल्ह्यात एकूण ७४ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी २१ हमीभाव खरेदी केंद्रांवर ६ फेब्रुवारी पर्यंत १४ हजार २५७ शेतकऱ्यांचे ३.७५ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.
म्हणजे जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी फक्त ५ टक्के सोयाबीनचीच खरेदी झाली आहे. उरलेले ९५ टक्के सोयाबीन खुल्या बाजारात कमी दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
५५ हजार बारदाना शिल्लक
खरेदी केंद्र सुरू असताना बारदाना उपलब्ध नसल्यामुळे तीन महिन्यात ३५ ते ४० दिवस खरेदी केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली होती. परंतु आता बारदाना शिल्लक राहिला असल्याचे दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी २१ खरेदी केंद्रांवर एकूण ८ लाख ७ हजार बारदाना उपलब्ध झाला होता.
त्यापैकी गुरुवारी (दि.६) शेवटच्या दिवसापर्यंत ७ लाख ५१ हजार बारदाना वापरला आहे. तर ५५ हजार बारदाना शिल्लक राहिला असल्याचे पणन अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज असताना बारदाना उपलब्ध झाला नाही परंतु आता हाच बारदाना शिल्लक राहिला आहे.