आरंभ मराठी / धाराशिव
शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गेलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आज चिखली शिवारात शेतकऱ्यांच्या आक्रोशापुढे नमते घेत माघार घ्यावी लागली.
गुरुवारी सकाळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे काही कर्मचाऱ्यांना घेऊन चिखली शिवारात गेले. यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीला किती मोबदला मिळणार हे अगोदर लेखी द्या आणि मगच मोजणी करा अशी अट घातली. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर मोणार्क या खाजगी कंपनीच्या काही लोकांनी शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
हे सर्व शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले आहेत. चिखली मधील 117 शेतकऱ्यांची 47.82 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी महाळंगी गावात मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापला असून, स्वातंत्र्य दिनाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यावेळीच शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत.