तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजाभवानी मातेच्या चरणी लाखो भाविक दरवर्षी नतमस्तक होतात. पण एवढ्या मोठ्या श्रद्धास्थळाच्या तुलनेत येथील सुविधा, नियोजन आणि पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या होत्या. शेगाव, शिर्डी व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास व्हावा, अशी दीर्घकाळची मागणी भाविकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सातत्याने होत होती.
तुळजापूरचे आमदार तथा भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर राज्य सरकारने १६८८ कोटी रुपयांचा व्यापक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून, लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
याबद्दल तुळजापूरकरांच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा उद्या गुरुवारी सायंकाळी तुळजापुरात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याची तयारी सुरू आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असूनही येथे योग्य ते नियोजन, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षितता आणि भाविकांसाठी सुविधा यांचा अभाव अनेक वर्षांपासून होता.भाविकांसाठी सुलभ दर्शन तसेच मूलभूत सुविधा निर्माण करतानाच या आराखड्यात पर्यटन विकास तसेच प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक संदर्भ साकारण्यात येणार आहेत.
उद्या सायंकाळी भवानी कुंड परिसरात भव्य नागरी सत्कार
आराखड्यातून तुळजापूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. ऐतिहासिक निधी मंजुरीबद्दल तुळजापूरकरांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे.
हा सत्कार समारंभ गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी कुंड, पार्किंग परिसरात होणार असून, संपूर्ण तुळजापूर शहरात या कार्यक्रमासाठी तयारी सुरू आहे.
बावनकुळेंचा राजकीय दौरा आणि संघटनात्मक संवाद
महसूलमंत्री बावनकुळे हे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा दौरा केवळ सत्कारापुरता न राहता राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
तुळजापूरचा कायापालट,
या ऐतिहासिक निर्णयामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या चेहऱ्यामोऱ्यात आमूलाग्र बदल होणार असून, येत्या काही वर्षांत हे शक्तिपीठ आधुनिक व्यवस्थेसह अध्यात्मिक पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल, असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.