आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोशल मीडियावरील तीन पेजविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकारी, धाराशिव नगर परिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, उद्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असतानाही ‘धाराशिव 2.0 (Dharashiv 2.0)’, ‘jilha_dharashiv’ आणि ‘all.about_dharashiv’ या सोशल मीडिया पेजवर नियमबाह्यरीत्या एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अस्तित्वात नसलेल्या बनावट टीव्ही चॅनलचा रिपोर्ट तयार करून भाजपच्या उमेदवार सौ. नेहा काकडे विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार सौ. परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दाखवले आहे.
मतदानापूर्वी एक्झिट पोल प्रसिद्ध करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे, तसेच आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारातून मतदारांच्या मनावर अनधिकृत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असून, भारतीय जनता पक्षाशी संगनमत करून फेक न्यूज प्रसारित करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटी माहिती पसरवणे आणि अपप्रचार करणे हे निवडणूक प्रक्रियेत गंभीर गुन्हे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पेज चालकांवर आणि व्यक्तींवर योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची विनंती निवेदनात केली आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदारांची दिशाभूल टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीतून केली आहे.









