आरंभ मराठी / भूम
भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिक्कीचा पत्रा लागल्यामुळे एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील ईट येथे घडली.
आक्का ट्रॅव्हल्सची एक बस शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वाशी येथून ईट मार्गे पुण्याकडे जात होती. या भरधाव ट्रॅव्हल्स गाडीची डिग्गी उघडी असल्याने मागील जाणाऱ्या दुचाकीस्वराला त्या डिग्गीचा पत्रा लागल्याने प्रवीण शिवाजी भोसले (वय- 19) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल आप्पा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आक्का ट्रॅव्हल्सची गाडी (क्रमांक एम एच 01 सीआर 8154) ही वाशी येथून ईट मार्गे पुण्याकडे जात होती. याच वेळी येथील प्रवीण भोसले व विशाल भोसले हे दोघे मोटरसायकल वरून शेतामध्ये जात होते. गाडीची डिग्गी उघडी असल्याने दुचाकी स्वराची डिगीच्या पत्र्याला जोराची धडक बसल्याने एक जण जागीच ठार झाला आहे.
मोटरसायकल वरील विशाल भोसले हा गाडी चालवत होता त्याला अचानक गाडीचा पत्रा दिसला व त्याने मान खाली केली आणि मागे बसलेला प्रवीण भोसले याच्या डोक्याला डीग्गीचा पत्रा लागला. प्रवीण भोसले यास तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
परंतु, डॉक्टरांनी मयत म्हणून घोषित केले. अपघात घडून देखील आक्का ट्रॅव्हलच्या गाडी चालकास हा प्रकार लक्षात न आल्याने त्याने बस ईट येथील थांब्यावर थांबवली. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी अपघात झाल्याचे ड्रायव्हरला सांगितले.
त्यावेळी गाडीजवळ मोठा जमाव जमा झाला होता. संतप्त झालेल्या जमावाने ड्रायव्हरला मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या. ईट येथे दूरक्षेत्र कार्यालय व पोलीस स्टॉप असताना देखील अपघातस्थळी एकही पोलीस कर्मचारी आला नाही. रात्री उशिरा वाशी पोलीस स्टेशन मधून पोलीस दाखल झाले होते.
यावेळी वाशी येथून ट्रॅव्हल्समध्ये बसलेला प्रवाशांचे खूप हाल झाले. बस वाशी पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले असुन पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे १९ वर्षीय युवकाचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.