आरंभ मराठी/ धाराशिव
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज सोमवारी दुपारी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड रविवारी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर तिथे त्यांच्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. संबंधित हल्लेखोरांच्या पाठीशी असलेल्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गायकवाड यांनी आजवर सर्व जातीधर्माच्या तरुणांना विज्ञानवादी विचार सांगून उद्योग, व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले असून, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
हा मोर्चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चामध्ये धाराशिवकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.