संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे तरुणांना आवाहन,
धाराशिव रोटरी क्लबचा पदग्रहण थाटात
प्रतिनिधी / धाराशिव
वाळवंटात असलेली दुबई जगाची आर्थिक राजधानी होऊ शकते, जगातील सर्वात मोठ्या 8 कंपन्यांचे सीईओ भारतीय नागरिक होऊ शकतात, अनेक देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती भारतीय होतात.पण त्यात मराठी माणूस नसतो. म्हणून मराठी तरुणांनी राजकारण, धर्मकारण, जातीय संघर्षात अडकून न पडता सातत्याने उद्योग, व्यवसायाचा विचार करावा, गुलामगिरीची मानसिकता सोडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बाहेर पडा, असे आवाहन पुण्यातील आनंदतारा ग्रुपचे प्रमुख तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. धाराशिव रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
शहरातील परिमल मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 12) सायंकाळी झालेल्या या समारंभाला रोटरी क्लबचे प्रांतपाल सुधीर लातूरे, सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी, धाराशिव रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष रणजीत रणदिवे, सचिव प्रदीप खामकर, मावळते अध्यक्ष डॉ.श्रीराम जिंतूरकर, सचिव आनंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
उद्योगाच्या संधी, या विषयावर प्रवीण गायकवाड बोलत होते. ते म्हणाले, दुबईमध्ये 50 टक्के भारतातील लोक राहतात. दुबई हा वाळवंटातला स्वर्ग असलेला देश आहे. जगाच्या पाठीवरील अनेक देशातील लोक दुबईमध्ये गुण्या गोविंदाने वास्तव्य करतात. आपल्याकडे देव, धर्म, जात, आरक्षण,राजकारण, क्रिकेट यामध्ये तरुण पिढी अडकून पडत आहे. गुजराथी, मारवाडी, सिंधी समाज कायम उद्योगविषयी चर्चा करतो.
त्यामुळे हा समाज जगाच्या पाठीवर अनेक देशात उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून स्थिरावला आहे. मराठी माणूस मात्र राजकारण, जात, धर्मात गुंतून पडतो. सरकारकडे शायनिग इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप, अशा उद्योगाच्या अनेक योजना आहेत. मात्र, यातून उद्योगासाठी काहीही फायदा झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या गावगावातील अनेक तरुणांचे वय 40 च्या वर गेले आहे. नोकरीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
पुढे लग्नाच्या देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. पुढे कसे जायचे, या विवंचनेत तरुण अडकला आहे. मात्र,आपल्यापेक्षा कितीतरी मोठी समस्या असलेल्या दुबईसारख्या देशात वाळवंटात स्वर्ग निर्माण होत असेल तर आपल्याकडे 100 टक्के परिवर्तन शक्य आहे.
प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन नक्कीच आहे. आर्थिक विवंचनेत समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी एकत्र मिळून व्यवसाय उभे केले पाहिजेत. रोटरी क्लबच्या अनेक सदस्यांनी हा प्रयोग केला,ही कौतुकास्पद बाब आहे. सहकार ही त्यातूनच निर्माण झालेली चळवळ आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर पहिला उभारला. त्यानंतर राज्यात 250 कारखाने उभे राहिले. सहकारी सूतगिरण्या, कुक्कुटपालन अनेक उद्योग सुरू झाले.
शेअर बाजार हे सहकाराचे दुसरे रूप आहे. आपली मानसिकता दरिद्री असेल तर जगातला कुठलाही माणूस आपल्यामध्ये बदल करू शकत नाही. उल्हास नगर, पिंपरी आदी भागात उद्योगांमध्ये दिसणारा सिंधी हा समाज स्थलांतरित झालेला आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यास हा समाज दिसून येतो. सिंधी, शीख, मारवाडी,गुजराथी या समाजाचा आदर्श घेतला पाहिजे. जगाच्या पाठीवर उद्योगासाठी मोठ्या संधी आहेत. आपण जग आपले केले पाहिजे. वैश्विक मानसिकता केली पाहिजे.
आपल्या देशाच्या एकूण बजेटपेक्षा कितीतरी अधिक पैसे जगभरातून आपल्या देशात येतात.ही बाब आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली आहे.
अमेरिकेचा 68 टक्के व्यापार चीनने ताब्यात घेतला आहे.
जगाच्या एकूण व्यापारापैकी 28 टक्के व्यापार चीनकडे आहे.
आपला धाराशिवचा भाग एकेकाळचा समृद्ध भाग होता.पुन्हा तशीच समृद्धी आणण्यासाठी मानसिकता बदलायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी उद्योग, व्यापार सुरू केला होता. आताचे सरकार
लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना,अशा योजनेतून मानसिकता गुलामगिरी करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशात आर्थिक क्रांती कशी होणार, असा प्रश्न करून जगावर राज्य करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बाहेर पडा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
तत्पूर्वी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे
यांनी समाजोपयोगी काम करत रहा, असे आवाहन करून रोटरीच्या तत्त्वांचा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले, आपण सत्य बोलतो का ,जे कांही करतो तो न्यायदायक आहे का, याचा विचार करावा. सर्वांशी संबध टिकवावे व जो प्रोजेक्ट करतो तो फायदेशीर आहे का, याचाही डोळसपणे विचार करा. चांगल्यासाठी एकत्र या,आणि याच थीमने काम करत रहा.
प्रारंभी
धाराशिव रोटरी क्लबचा 2025-26 वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. धाराशिव रोटरी क्लबचे 37 वे अध्यक्ष म्हणून रणजीत रणदिवे आणि सचिव म्हणून प्रदीप खामकर यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी नूतन अध्यक्ष रणजीत रणदिवे यांनी येणाऱ्या वर्षभरात रोटरीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
मावळते अध्यक्ष डॉ.श्रीराम जिंतूरकर यांनी गेल्यावर्षीच्या कामाचा आढावा मांडला.समारंभात मान्यवरांच्या हस्ते अंध व्यक्तींना काठ्या, गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आल्या तसेच निपाणी (ता. कळंब) येथील प्रयोगशील शेतकरी परवीन फखरुद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले तर नूतन सचिव प्रदीप खामकर यांनी आभार मानले. या समारंभासाठी धाराशिव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.