आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात प्रचंड वाढ झाली असून, नागरिक उन्हाच्या झळांनी त्रस्त झाले आहेत. धाराशिव शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे.
या भीषण उष्णतेमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी होत असून, लोक घरात किंवा सावलीत आसरा शोधत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनचा पाऊस आठवडाभर लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून १ जून रोजी केरळच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सामान्यतः ७-८ जून दरम्यान मान्सून केरळात दाखल होतो, मात्र यंदा त्याचे आगमन जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी होण्याची शक्यता आहे.
याच अंदाजानुसार, मुंबईमध्ये १० ते ११ जूनच्या दरम्यान पावसाचा पहिला शिडकावा होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो हळूहळू उत्तर आणि पश्चिम भारताकडे सरकतो.
कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात प्रवेश करणारा मान्सून पुढे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पसरतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात हा पाऊस १२ ते १५ जून दरम्यान दाखल होणार आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यात बऱ्यापैकी पेरण्या होण्याची शक्यता आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार –
यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाने आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा पावसाळ्यात देशभरात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार, हा पाऊस ‘सामान्यपेक्षा जास्त’ या श्रेणीत मोडतो. सामान्यपेक्षा जास्त पावसामुळे देशातील जलाशयांचा साठा वाढण्यास मदत होईल, तसेच भूजल पातळी वाढण्यासही मदत होईल.
धाराशिवमध्ये १२ ते १५ दरम्यान मान्सून दाखल होणार –
मान्सूनची चाहूल लागली असून पुढील काही दिवसांत म्हणजेच १४ ते १६ मे दरम्यान मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल होईल. या वर्षीचा मान्सूनचा सुरुवातीचा प्रवास अडखळत होईल अशी शक्यता आहे. १५ मे ते २२ मे या कालावधीत मान्सून अंदमानात असेल. अरबी समुद्रात २३ मे रोजी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल व मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल. २५ मे दरम्यान मान्सून श्रीलंका मध्ये दाखल होईल. केरळ किनारपट्टी भागात २७ ते २९ मे किंवा दोन दिवस अधिक वेळ लागेल. केरळ ते गोवा हा मान्सून चा प्रवास ७ ते ९ दिवसांत पूर्ण होईल. ५ ते ८ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. तर १२ ते १५ जून दरम्यान मान्सून मराठवाड्यात बऱ्याच भागात दाखल होईल असा अंदाज आहे.
सुरज जयपाल जाधव
हवामान अभ्यासक (रुईभर)